शिवसेनेच्या उत्तर भारतीय,दक्षिण भारतीय विंगचे पदाधिकारी मराठीत बोलतात का ?

मुंबई नगरी टीम

नवी दिल्ली : दुकानदाराने मराठी बोलण्यास नकार दिल्याने लेखिका शोभा देशपांडे यांनी  पुकारलेल्या आंदोलनाला अनेक राजकीय नेत्यांसह सामान्यांनी पाठिंबा दिले आहे.असे असताना केंद्रीय मंत्री आणि रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी यावर विरोधी भूमिका घेतली आहे.फक्त मराठी भाषा बोलण्याची सक्ती करणे संविधान विरोधी आहे. शिवसेना मराठी भाषेवर राजकारण करत आहे.त्यामुळे आपला शोभा देशपांडे आणि शिवसेना यांच्या भूमिकेला विरोध आहे,असे रामदास आठवले यांनी म्हटले.

फक्त मराठी बोलण्याची सक्ती हे संविधान विरोधी आहे. शिवसेनेत उत्तर भारतीय,दक्षिण भारतीय विंग आहेत. ते सगळे मराठी बोलतात का?, असा सवाल रामदास आठवले यांनी उपस्थित केला आहे. तसेच शिवसेना मराठी भाषेवर राजकारण करत आहे. मराठी बोलणे सक्तीचे करता येणार नाही. शोभा देशपांडे आणि शिवसेनेच्या भूमिकेला माझा विरोध आहे”, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. मुंबईच्या कुलाबा येथील एका ज्वेलर्सने लेखिका शोभा देशपांडे यांच्याशी मराठीत बोलण्यास नकार दिला. त्यानंतर शोभा देशपांडे यांनी पुकारलेल्या आंदोलनाची दखल घेत शिवसेना आणि मनसैनिकांनी दुकानदाराला चांगलाचा दणका दिला. शोभा देशपांडे यांच्या या लढ्याचे कौतुक होत असतानाच रामदास आठवले यांची भूमिका मात्र विरोधी आहे. त्यामुळे रामदास आठवलेंना भय्यांचा पुळका आला का?, असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, रामदास आठवले यांनी यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या वक्तव्याचा देखील चांगलाच समाचार घेतला. छत्रपतींना बिनडोक म्हणणे योग्य नाही. सर्वांनाच डोकी आहेत म्हणून बिनडोक म्हणणे चुकीचे आहे, असे रामदास आठवले म्हणाले. उदयनराजेंबद्दल प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य चुकीचे असून शाहू महाराज आणि आंबेडकर वंशजांनी वाद घालू नये, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.

Previous articleआता संभाजी भिडे सातारा,सांगली आणि कोल्हापूर बंद करणार का ?
Next articleजितेंद्र आव्हाडांसह ठाकरे सरकारमधील तिघांचे विकेट पडणार !