मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यातील ठाकरे सरकारचे येत्या काही दिवसांत तीन विकेट पडणार, असा खळबळजनक दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.यामध्ये त्यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचे नाव घेतले आहे जितेंद्र आव्हाड आणि किशोरी पेडणेकर हे जेलमध्ये जाणार असून अनिल परब हे म्हाडा जमीनप्रकरणी घरी बसणार, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.
किरीट सोमय्या यांनी अनंत करमुसे मारहाण प्रकरणी आज ठाणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली. अनंत करमुसे मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना कधी जेलमध्ये टाकणार, असा सवाल यावेळी त्यांनी केला. दरम्यान, याआधीही किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर आणि अनिल परब यांनी अनधिकृत बांधकाम करून भष्ट्राचार केल्याचा आरोप केला आहे. तसेच त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार अर्जही त्यांनी दाखल केला आहे. किरीट सोमय्या गेल्या अनेक दिवसांपासून संबंधित प्रकरणांवर सातत्याने भाष्य करत आहेत. तर आता त्यांनी जितेंद्र आव्हाड,किशोरी पेडणेकर आणि अनिल परब या तिघांचीही विकेट पडणार असा दावा केला आहे. त्यामुळे हे तीनही नेते यावर आता काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
किरीट सोमय्या यांनी चॅनेल टीआरपी प्रकरणावरूनही सरकारला टोला लगावला आहे. टीआरपी प्रकरणात ठाकरे सरकार आणि गृहमंत्री अनिल देशमुख त्या चॅनेल वाल्यांना का घाबरत आहेत. हे सरकार आल्यापासून गृहमंत्री अनिल देशमुख जेलमध्ये टाकण्याची का धडपड करत आहेत, असेही ते म्हणाले. विरोधी पक्ष म्हणून आम्ही कोरोना काळात पूर्ण जबाबदारीने काम करत आहोत. कोरोनामुळे किती जण मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे हे सरकार त्यांच्या पापाने पडणार, असा टोलाही त्यांनी लगावला.