हो मीच म्हटलं राष्ट्रवादीत जा ! एकनाथ खडसेंचा मोठा खुलासा

मुंबई नगरी टीम

जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या आदेशाने आणि सल्ल्यानेच मी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असा गौप्यस्फोट माजी आमदार उदयसिंग पाडवी यांनी केला आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या या विधानाला एकनाथ खडसे यांनी देखील दुजोरा दिला आहे. पाडावी यांना आपणच राष्ट्रवादीत प्रवेश करण्यास सुचवले असे एकनाथ खडसे यांनी सांगितले. अनेक सहकारी आहेत, जे माझ्यावर विश्वास ठेवत पक्षांतर करतात, असे म्हणत एकनाथ खडसे यांनी जणू भाजपला अप्रत्यक्षरीत्या इशाराच दिला आहे.

ज्येष्ठ नेते आणि आमचे मार्गदर्शक एकनाथ खडसे यांच्या आदेशाने आणि सल्ल्याने मी राष्ट्रवादी प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असे उदयसिंग पाडावी यांनी कबूल केले आहे. तर याबाबत एकनाथ खडसे यांना माध्यमांनी विचारले असता त्यांनी आपण असे सुचवल्याचे मान्य केले आहे. “हो खरं आहे. त्यांनी विचारले मी कोणत्या पक्षात जाऊ, तेव्हा मी राष्ट्रवादीमध्ये जा, असे म्हटले. काही लोकं अशी आहेत, ज्यांचा नाथाभाऊंवर विश्वास आहे”, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले. तर जळगाव, नाशिक बुलढाणा येथील आमदार, खासदार राष्ट्रवादी प्रवेश करणार का?, असे विचारले असता आपण भाजपमध्ये असून याबाबत काही सांगू शकत नाही, असे त्यांनी म्हटले.

उदयसिंग पाडावी यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या प्रवेशावरून त्यांनी मोठा खुलासा केला असून यासाठी त्यांना एकनाथ खडसे यांचा सल्ला मिळाला होता. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी चर्चा रंगली आहे. मात्र राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचे वृत्त हे एकनाथ खडसे यांनी वारंवार फेटाळून लावले. पंरतु असे असतानाही अनेक कारणांवरून एकनाथ खडसे आणि राष्ट्रवादीचा संबंध जुळताना दिसत आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना अधिक जोर आला आहे.

Previous articleमहाराष्ट्रात डिसेंबर पुर्वी राष्ट्रपती राजवट लागू होईल ; या बड्या नेत्यांने वर्तवले भाकित
Next articleमुंबईतील वीज खंडित प्रकरण : गाफिलपणा झाला आहे का हे तपासण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश