उद्धव ठाकरे एक प्रकारे मोदींचेच काम पुढे नेतायत;संजय राऊतांचा फडणवीसांना खोचक टोला

मुंबई नगरी टीम

मुंबई : आरेतील मेट्रोची कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. पर्यावरणप्रेमींसह अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले असताना भाजपमधील अनेक नेत्यांनी यावर टीका केली आहे. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावत म्हटले की, उद्धव ठाकरे हे एकप्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच राष्ट्रीय कार्यक्रम पुढे नेत आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील इतर भाजप नेत्यांनीही मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचे स्वागत केले पाहिजे असे, संजय राऊत यांनी म्हटले आहे.

संजय राऊत आज माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमी पर्यावरण रक्षणाची भाषा करतात.मोदींच्या कार्यकाळात गंगा शुद्धीकरण, सेव्ह टायगर व जंगल वाचविण्यासाठीचे इतर उपक्रम हाती घेण्यात आले. त्यामुळे आरेतील जंगल वाचवून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी एकप्रकारे पंतप्रधान मोदींचाच कार्यक्रम पुढे नेला असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. मुख्यमंत्र्यांनी आरे जंगलाचे क्षेत्र ६०० वरून ८०० एकरापर्यंत वाढवले. त्यामुळे भाजप नेत्यांनी देखील या भूमिकेचे स्वागत केले पाहिजे.

पर्यावरणाच्या रक्षणासाठी राज्य सरकारने मेट्रो ३ प्रकल्पातील आरे परिसरातील नियोजित कारशेड कांजूरमार्गला हलवली. पंरतु या निर्णयामुळे भाजप नेते आक्रमक झालेले दिसत आहेत. कारशेड कांजूरमार्गला हलवल्याने प्रकल्पाच्या खर्चात वाढ होईल. शिवाय प्रकल्प पूर्ण होण्यासही विलंब होईल, अशा मुद्द्यांवरून भाजप नेते महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत.

Previous articleमुंबईतील वीज खंडित प्रकरण : गाफिलपणा झाला आहे का हे तपासण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
Next articleमाझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची गरज नाही,मुख्यमंत्र्यांचे राज्यपालांना खरमरीत पत्र