मुंबई नगरी टीम
मुंबई : माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाण पत्राची आवश्यकता नाही.तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही,अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना उत्तर दिले आहे.मंदिरे खुली करण्याच्या मुद्द्यावरून राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.यात राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाचा विसर पडला आहे का ? असा सवाल केला होता.यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहित राज्यपालांना उत्तर दिले आहे. तर मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्यांचे हसत स्वागत करणे माझ्या हिंदुत्वाचा बसत नाही,असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे.
मुख्यमंत्री काय म्हणाले पत्रात?
“प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दलचे पत्र मिळाले. या बद्दल सरकार जरूर विचार करत आहे. जनतेच्या भावना,श्रद्धा जपताना त्यांच्या जीवाची काळजी घेणे हे आमच्या सरकारचे प्रथम कर्तव्य आहे,आणि म्हणूनच कोरोनाशी लढताना जसा एकदम लॅाकडाऊन करणे चुकीचे तसेच तो एकदम उठवणेही अयोग्यच.करोनासोबत अथवा त्याचा धोका टाळून जगणे हे अंगवळणी पडावे म्हणून सध्या राज्यात ‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी ‘ हि मोहीम राबवली जात आहे.आरोग्यविषयी सुचना देणे,जनजागृती करणे,आरोग्य तपासणी करणे, आवश्यकतेनुसार चाचणी व उपचार करणे हे सर्व आपल्या राज्यातील डॅाक्टर्स आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स,आंगणवाडी सेविका नागरिकांच्या घरोघरी जाऊन करत आहेत. याची आपल्याला कल्पना असेलच. कदाचित असा प्रयत्न करणारे महाराष्ट्र हे एकमेव अथवा पहिले राज्य असेल.
महोदय,आपण या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे तो योग्यच आहे,मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही.माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मिर म्हणणा-यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही . Have you suddenly turned ‘Secular yourselves, the term you hated ? असा प्रश्न आपल्याला का पडावा? केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि न उघडणे म्हणजे Secular असे आपले म्हणणे आहे का ? मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत त्या घटनेचा महत्वाचा गाभा ‘Secularism आहे तो आपल्याला मान्य नाही का?
मला या संकटाशी लढताना काही divine premonition येतात का ? असाही प्रश्न आपणांस पडला आहे,आपल्याला अशा गोष्टींचा अनुभव असेल मात्र मी एवढा थोर नाही. इतर राज्यांत, देशात बरे वाईट काय घडते आहे ते बघत माझ्या महाराष्ट्रात चांगले कसे करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतो आहे. आपण म्हणता गेल्या ३ महिन्यात काही शिष्टमंडळांनी भेटून आपल्याला प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दल विनंती केली, त्यातील ३ पत्रे आपण सोबत जोडली आहेत.ही तीनही पत्रे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि समर्थकांची आहेत.हा योगायोग असू शकतो.असो आपल्या विनंतीचा महाराष्ट्र सरकार गांभिर्याने विचार करत असून सर्व काळजी घेवून लवकरात लवकर याबाबत निर्णय घेतला जाईल हि खात्री मी आपल्याला देतो”.