मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यपालांच्या पत्रावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या उत्तरानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधी पक्षाकडून मुख्यमंत्र्यांवर टीका केली जात असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी या प्रकरणात उडी घेतली आहे. महाराष्ट्रात बार आणि दारूची दुकाने सुरू केली जातात.मग मंदिरे काय डेंजर झोन मध्ये आहेत का?, असा प्रश्न विचारत अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.पण यावर आता गप्प बसतील ते शिवसैनिक कसले.यावरून शिवसेना महिला आघाडी देखील आक्रमक झाली असून अमृता फडणवीस यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
शिवसेनेच्या सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी याबाबत दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी अमृता फडणवीस यांना चांगलेच सुनावले. “अमृता फडणवीस कोण आहेत ? आमदार,खासदार,नगरसेविका आहेत का ? त्या कधी राजकारणात आल्या ? त्या माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आहेत.त्यांनी त्याच भूमिकेत राहावे.आमदार, खासदार, नगरसेवक,प्रवक्ता असेल तर ऐकून घेऊ.पती मुख्यमंत्री झाल्यावर राजकारणात आलेल्यांनी आम्हाला शिकवू नये.आदित्य ठाकरेंसह शिवसेना पक्षाची ही चौथी पिढी राजकारणात आहे. आम्हाला काय करायचे हे शिकवू नये. आम्ही संस्कृती जपतोय. आम्ही तोंड उघडले तर त्यांना तोंड लपवायला जागा राहणार नाही”, असा इशाराच विशाखा राऊत यांनी दिला आहे.
मंदिरे उघडण्याची मागणी जोर धरत असताना अमृता यांनीही याच मुद्यावरून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. “वाह प्रशासन! बार आणि लिकर दारूची दुकाने सुरू झाली आहेत. मंदिरे काय डेंजर झोनमध्ये आहेत का? अनेकदा असे होते की, बऱ्याच गोष्टींसाठी प्रमाणपत्राची आवश्यकता असते”, अशा शब्दांत अमृता यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी पत्राद्वारे दिलेल्या उत्तरावर देवेंद्र फडणवीस यांनीही नाराजी व्यक्त करत हे दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.