राज्यपाल धर्मनिरपेक्ष आहेत का ? राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी तपासले पाहिजे – संजय राऊत

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यातील मंदिरे खुली करण्याच्या मुद्द्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून हिंदुत्वाची आठवण करून दिली. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा राज्यपालांवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल हे धर्मनिरपेक्ष आहेत की नाही ? हे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी तपासले पाहिजे,असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. तर राजकीय भूमिका घेऊन काम करणे हे योग्य नसल्याचा टोला देखील त्यांनी राज्यपालांना हाणला आहे.आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातूनही राज्यपालांच्या भूमिकेवर टीकास्त्र सोडण्यात आले.

घटना सांगते की,पंतप्रधान,राष्ट्रपती आणि राज्यपाल ही पदे धर्मनिरपेक्ष असतात.हिंदुत्व आमच्या हृदयात आहे.पण देश घटनेच्या आधारे कार्य करतो.राज्यघटना ही धर्मनिरपेक्ष आहे.महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केला.राज्यपाल धर्मनिरपेक्ष आहेत की नाही? हे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी विचारले पाहिजे. महाराष्ट्रातील मंदिरे बंद ठेवायची ही काही आमची भूमिका नाही पंरतु लोकांचे आयुष्य वाचवणे आमच्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.तसेच राज्यपालांची भूमिका ही राजकीय असल्याची टीकाही त्यांनी केली.

“राज्यपालांनी आपल्या भूमिकेत काम करावे. घटनेने ज्या भूमिका त्यांना दिल्या आहेत, त्या त्यांनी पार पाडाव्यात. गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, ओदीशा, हरियाणा राज्याचे राज्यपाल हे घटनेच्या चौकटीत काम करताना दिसतात. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राचे राज्यपाल हे एका वेगळ्या भूमिकेत काम करताना दिसत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तिथले राज्यपाल यांच्यात रोज संघर्ष होत आहे. संघर्ष करण्याची काय गरज?. मग असा संघर्ष गुजरात, बिहार, उत्तर प्रदेश सारख्या राज्यात का होत नाही?, महाराष्ट्रात का केला जात आहे? जी राज्ये आपल्या विचारांची नाहीत. त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना काम करू द्यायचे नाहीत. हे घटनात्मकदृष्ट्या योग्य आहे, असे मला वाटत नाही”, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.”गुजरात, मथुरा,गोवामधील मंदिरे, उघडली आहेत का? हा प्रश्न आहे. मग महाराष्ट्रात भाजपचे नेते आंदोलन करतात.त्याच वेळेला राज्यपाल एक पत्र पाठवतात. राज्यपालांना मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवण्याचा पूर्ण अधिकार आहे. मार्गदर्शन त्यांनी केले पाहिजे. राज्यपाल खूप जुने आणि जाणते नेते आहेत. पण राजकीय भूमिका घेऊन काम करणे हे राज्यपाल पदाला योग्य नाही”, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Previous article‘जलयुक्त शिवार’ चौकशीचा अहवाल येताच पुढील कारवाई करणार : गृहमंत्री
Next articleकार्यपद्धती निश्चित झाल्यावर राज्यातील सिनेमागृहे सुरु करणार : मुख्यमंत्री