मुंबई नगरी टीम
मुंबई : मुंबई लोकलचा प्रवास सर्व सामान्यांसाठी केव्हा सुरू करणार,असा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे.या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.घटस्थापनेच्या मुहूर्तावर सर्व महिलांना मुंबई लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.त्यानुसार उद्या १७ ऑक्टोबरपासून सर्व महिला वर्गाला लोकलने प्रवास करता येणार आहे. यासाठी वेळ मर्यादा देखील आखून देण्यात आली आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत आणि संध्याकाळी ७ नंतर पुढे प्रवास करता येणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे महिलांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. मुंबईच्या लोकल मधून आता सर्व महिलांना प्रवास करता येणार आहे.राज्य सरकारने तसे परीपत्रकच जाहीर केले आहे. उद्या पासून सुरू होणा-या शारदीय नवरात्र उत्सवापासून महिलांना लोकल प्रवासाची परवानगी देऊन राज्य सरकारने महिलांना गोड बातमी दिली आहे.. कोरोनाचा संसर्ग कमी झालेला नाही,त्यामुळे लोकलमध्ये गर्दी होऊ नये या दृष्टीने महिलांना लोकल प्रवास सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत तर संध्याकाळी ७ नंतर शेवटची लोकल असे पर्यंत प्रवास करण्याची परवानगी महिलांना राज्य सरकारने दिली आहे.त्यानुसार मुंबई आणि एमएमआर मधील महिलांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे लोकल प्रवास करताना महिलांना क्यू आर कोडची देखील गरज नसेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.दरम्यान, महिलांना ही परवानगी देण्यात आली असली अत्यावश्यक सेवा वगळता इतर पुरुषांना लोकल प्रवासासाठी अद्याप प्रतीक्षा करावी लागणार आहे.
कोरोनामुळे पुकारण्यात आलेल्या लॉकडाउन दरम्यान मुंबई लोकल मार्चपासून बंद होती.त्यानंतर लॉकडाउन शिथिलीकरण करताना केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली. तर सर्व सामान्य नागरिकांना मुंबई लोकलचा प्रवास करता येत नसल्याने त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. पर्यायी बसने प्रवास करून मुंबईकरांचे कित्येक तास प्रवासातच जात आहेत. हाच मुद्दा उचलून धरत मनसेने आंदोलन केले होते. सर्वांना लोकल प्रवासाची मुभा द्या, अशी मागणी मनसेने लावून धरली होती. राज्य सरकारने या दिशेने आपले एक पाऊल टाकत सर्व महिलांना लोकल प्रवासाची परवानगी दिली आहे.