आज विस्तार : शिंदे गट आणि भाजपकडून जुन्याच चेह-यांना संधी,कुणा कुणाला मंत्रीपद मिळणार ?

  • मुंबई नगरी टीम

मुंबई । गेली सव्वा महिना रखडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला आहे. आज मंगळवारी सकाळी ११ वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा राजभवन येथे पार पडणार आहे.राज्यात गुजरात सरकार प्रमाणे नव्या चेह-यांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा होती मात्र शिंदे गट आणि भाजपकडून जुन्याच चेह-यांना संधी दिली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.विस्तारात भाजप आणि शिंदे गटाकडून प्रत्येकी ९ जणांना संधी दिली जाणार असल्याचे समजते.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी होवून सुमारे सव्वा महिन्याचा कालावधी उलटून गेला असला तरी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याने विरोधकांकडून टीका होत होती. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल नंदनवन निवासस्थानी बैठक पार पडली.या बैठकीत संभाव्य यादीला अंतिम स्वरूप देण्यात आले आहे.येत्या १५ ऑगस्टपूर्वी विस्तार केला जाईल,असे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले होते.मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात झालेल्या बैठकीत यादीवर निर्णय घेण्यात आल्यावर अखेर आज मंगळवारी सकाळी ११ वाजता राजभवनात शिंदे गटातील आणि भाजपकडील प्रत्येकी ९ जणांचा शपथविधी पार पडणार आहे.शिंदे मंत्रिमंडळात नव्या चेह-यांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा होती.मात्र शिंदे गट आणि भाजपकडून जुन्याच चेह-यांना संधी दिली जाणार आहे.भाजपकडून चंद्रकांत पाटील,राधाकृष्ण विखे पाटील,सुधीर मुनंगटीवार,गिरिश महाजन,सुरेश खाडे,बबनराव लोणीकर,प्रविण दरेकर,रविंद्र चव्हाण,नितेश राणे यांच्या नावाची चर्चा आहे.तर शिंदे गटाकडून उदय सामंत,संदीपान भुमरे,गुलाबराव पाटील,दादा भुसे,दीपक केसरकर शंभूराजे देसाई,संजय शिरसाट,भरत गोगावले यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाणार असल्याने भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आशिष शेलार यांच्याकडे दिली जाणार असल्याची चर्चा आहे.काल संभाव्य मंत्र्यांना संबंधितांकडून फोन करण्यात येवून मुंबईत पोहचण्याचे आदेश देण्यात आले आहेत.बंडकरून शिंदे यांच्यासोबत आलेल्या आमदारांची संख्या मोठी असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर आमदारांची नाराजी दूर करण्याचे आव्हान आहे.एकनाथ शिंदे गटातील आमदारांची ताताडीची बैठक काल रात्री सह्याद्री अतिथीगृहावर झाली आहे.या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी ज्यांना मंत्रीपद दिले जाणार नाही अशा आमदारांना अधिकचा विकास निधी देण्याचे आश्वासन दिले असल्याची चर्चा आहे.आज मंगळवारी  मंत्र्यांचा शपथविधी पार पडल्यानंतर दुपारी १ वाजता सह्याद्री अतिथीगृहात मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

Previous articleउद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना एकत्र आणा ! राज्यातील असंख्य शिवसैनिकांचे फोन
Next articleआदित्य ठाकरेंची कोरोना चाचणी निगेटिव्ह ; नाशिक,जळगाव दौरा रद्द