मुंबई नगरी टीम
पंढरपूर : राज्यातील मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती आणल्यानंतर राज्यातील वातावरण तापले आहे. आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे मराठा नेते देखील आक्रमक झाले आहेत. खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी तलवार काढण्याचं विधान केले होते. दरम्यान, आता वेळ आली तर मराठा आरक्षणासाठी घटना बदलण्यासाठीचा अभ्यास सुरू आहे,असे विधान संभाजीराजे भोसले यांनी केले आहे. संभाजीराजे आज पंढरपूरच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
मराठा आरक्षण हा राज्याचा विषय असून आपण एसीबीसी हा कायदा तयार केला आहे. मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास आहे, असे मागासवर्गीय आयोगने स्पष्ट केले आहे. विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांनी देखील मराठा आरक्षणासंदर्भातल्या कायद्याला मंजुरी दिल्यानंतर कायदा पारित झाला. या कायद्याला उच्च न्यायालयानेही कायद्याला मान्यता दिली आहे. तरीही राज्य सरकारकडून काही झाले नाही तर सरकारकडून जर राज्य घटना बदलून काही निर्णय घेण्याची प्रक्रिया असेल तर त्यासाठी माझा अभ्यास सुरू आहे, असं संभाजीराजे भोसले म्हणाले.
यावेळी, लवकरच राज्यातील सर्व पक्षीय खासदारांना घेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले. राज्य सरकारने केलेल्या कायद्याला न्यायालयाने स्थगिती दिली.ही स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारने जोर लावावा, आम्ही सर्वतोपरी त्यांना मदत करू, असेही संभाजीराजे म्हणाले.दरम्यान, राज्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने तात्काळ मदत द्यावी. मी छत्रपती या नात्याने रयतेसाठी राज्य आणि केंद्र सरकारमध्ये समन्वय साधणार आहे, मात्र मदत मिळाली पाहिजे असे संभाजीराजे भोसले म्हणाले.