साहेबांच्या सोबतीनं इथली जनता चिंब भिजली पण दिल्ली मात्र थिजली

मुंबई नगरी टीम

सातारा :  राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणा-या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या साता-यातील धो धो पावसातील सभेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे.या निमित्ताने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून या घटनेचा उजाळा देण्यात येत आहे.आज समाज माध्यमातून शरद पवार यांच्या पावसातील भाषणाचे फोटो आणि व्हीडीओ शेअर केले जात आहे तर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी समाज माध्यमातून विरोधकांना याचा आधार घेत टोला लगावला आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि साता-याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या गादीला हादरा देणा-या साता-यातील सभेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे.साता-यातील या सभेच्या आठवणी राज्यातील सर्वसामन्य नागरिकांप्रमाणेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मनात आजही घर करून राहिलेल्या आहेत.साता-यातील धो धो पावसातील या सभेचे फोटो आज राष्ट्रवादीच्या  प्रत्येक नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या कार्यालयात पाहवयास मिळत आहे.या सभेच्या वर्षपूर्तीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी समाज माध्यमातून उजाळा देत विरोधकांना या सभेची आठवण करून दिली आहे.या भाषणाचे व्हीडीओ आणि पवार यांचा पावसातील फोटो शेअर करीत काहींनी विरोधकांना सुनावले आहे.

त्यांनी पवारसाहेबांविरुद्ध रणनीती आखली…त्यांचे पैलवान म्हणे तेल लावून तय्यार होते.त्यांनी शड्डू ठोकले पण समोर पैलवानच दिसत नव्हते अशी त्यांची दर्पोक्ती…ते म्हणाले, शरद पवार संपले,तुम्ही महाराष्ट्राला काय दिलं, असंही साहेबांना विचारायचं धारिष्ट्य त्यांनी दाखवलं.पवारसाहेबांचं राजकारण संपलं… असंही अहंकारानं खिजवलं.पण १८ ऑक्टोबर २०१९ रोजी साताऱ्यात काहीतरी विलक्षण घडलं. साक्षात वरुणराजा पवारसाहेबांच्या स्वागताला धावून आला आणि या पावसात साहेबांच्या सोबतीनं इथली जनता चिंब भिजली पण दिल्ली मात्र थिजली…अशी पोस्ट शेअर करीत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.राज्यातील विधानसभेच्या निवडणूकीसोबतच सातारा लोकसभेची पोटनिवडणुक गेल्या वर्षी झाली. साताऱ्यातील जिल्हा परिषदेच्या मैदानावर राष्ट्रवादीची सांगता सभा झाली.धो..धो पाऊस असूनही शरद पवार यांची ही सभा यशस्वी झाली.मी मागील वेळी केलेली चूक यावेळी सातारच्या जनतेने दुरूस्त करावी, अशी साद पवार यांनी या सभेत घातली आणि या पोटनिवडणूकीत भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला.तर राष्ट्रवादीचा उमेदवार श्रीनिवास पाटील यांचा विजय झाला.

राज्यात आणि केंद्रात भाजपचा असलेला दबदबा पाहून लोकसभा निवडणुकीनंतर निवडणुकीच्या अगोदर राज्यातील राष्ट्रवादीच्या अनेक बड्या नेत्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला होता.राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या सातारा,सांगली,सोलापूर अशा ठिकाणी राष्ट्रवादीला खिंडार पडले होते.राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सातारा लोकसभेची निवडणुक लढून विजयी झालेले उदयनराजे भोसले यांनी आणि शिवेंद्रराज भोसले यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला होता. त्यामुळे शरद पवार यांचा दबदबा संपला.. समोर पैलवानच दिसत नाही अशी टीका भाजपकडून केली जात होती.अशा कठिण प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पायाला भिंगरी लावून पश्चिम महाराष्ट्र पिंजून काढला दुसरीकडे  भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अमित शहा यांच्यासह माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचारसभांनी पवार यांच्या पुढे आव्हान उभे केले होते.

पवार यांच्या सभेपूर्वी साता-यात नरेंद्र मोदी,अमित शहा यांच्या सभांनी मैदान गाजवले होते. साताऱ्यातील जिल्हा परिषदेच्या मैदानावर शरद पवार यांच्या सांगता सभेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. १८ ऑक्टोबर २०१९ रोजी झालेल्या या सभेसाठी शरद पवार भाषणाला उभे राहिले आणि धो..धो पावसाचा सुरूवात झाली. पवारांची सभा पावसात वाहून गेली म्हणून विरोधकांमध्ये आनंदाचे वातावरण असतानाच.धो..धो पाऊस सुरू असतानाही पवारांनी आपले भाषण थांबवले नाही.या पावसातही पवारांनी तुफान टोलेबाजी केली. मागील वेळी माझ्याकडून एक चूक झाली आहे. ही चूक या निवडणुकीत सातारकरांनी दुरूस्त करावी, असे आवाहन त्यांनी करताच.. कोण आला रे कोण आला…राष्ट्रवादीचा वाघ आला…अशा घोषणांनी मैदान दणाणून गेले.त्यांच्या या आव्हानाला प्रतिसाद देत पश्चिम महाराष्ट्र आणि साता-यातील जनतेने राष्ट्रवादीला साथ दिली.या पोटनिवडणूकीत भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले पराभूत झाले आणि पवारांनी पुन्हा एकदा आपला बालेकिल्ला काबीज केला. पवारांच्या या सभेनंतर राज्यातील राजकीय माहोल पुर्णत: पालटला आणि पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीची लाट आली.राज्यातील सत्तेचे राजकारण बिघडले. दुस-यांदा मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पाहणारे फडणवीस विरोधी पक्षनेते झाले.तर शरद पवार किंगमेकर ठरले…ते साता-यातील या  ऐतिहासिक सभेमुळे.

Previous articleपक्षाला दगा देणाऱ्या नेत्यांची जागा लोकांनी त्यांना दाखवून दिली : रोहित पवार
Next articleमराठा आरक्षणासाठी घटना बदलण्याचा अभ्यास सुरू; संभाजीराजे यांचं मोठं विधान