मुंबई नगरी टीम
सोलापूर : केवळ काहीतरी घोषणा करणार नाही.अतिवृष्टीमुळे जे मृत्युमुखी पडले आहेत त्यांच्या कुटुंबाना अर्थसहाय्य करणे आम्ही सुरु केले आहे.अजून परतीचा पाउस पूर्ण गेलेला नाही वेधशाळेने पुढील काही दिवस आणखी पावसाचा इशारा दिला आहे. हे संकट टळलेले नाही नसून,हवामान खात्याने धोक्याचा इशारा आहे मात्र पंचनामे सुरु झाले असून ते पूर्ण झाल्यावर संपूर्ण माहिती येताच नुकसानग्रस्त शेतक-यांना प्रत्यक्ष मदत केली जाईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज सोलापूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा करून शेतक-यांच्या व्यथा जाणून घेतल्या त्यांनतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी वरील माहिती दिली.जे जे काही करता येणे शक्य व आवश्यक आहे ते सगळे केल्याशिवाय राहणार नाही.राज्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना मदतीची घोषणा केली जाईल अशी शक्यता होती.मात्र केवळ काहीतरी घोषणा करणार नाही तर पंचनामे सुरु झाले असून ते पूर्ण झाल्यावर संपूर्ण माहिती येताच नुकसानग्रस्त शेतक-यांना प्रत्यक्ष मदत केली जाईल असे या पत्रकार परिषदेत सांगितले. सध्या संकट संपलेले नाही असे सांगतानातय प्राणहानी होऊ देऊ नका अशा सूचना प्रशासनाला दिल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.पूर परिस्थितीमध्ये राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन केंद्राकडे मदत मागितली पाहिजे, शेतकऱ्यांचे दु:ख कमी केले पाहिजे असे सांगतानात,अशा संकटात राजकारणाचा चिखल उडवू नये असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
या पावसाची ही परिस्थिती काही आत्ताच समजली नाही असे नाही.तर आम्ही सातत्याने याची माहिती घेत होतो आणि प्रशासनही संपर्कात होते असे सांगून,अजून दोन दिवस नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार असल्याचे मुक्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यातील विविध भागात झालेल्या नुकसानाची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.शुक्रवारी पंतप्रधानांचा सुध्दा मला फोन आला होता. त्यांनी आवश्यक ती मदत करू असे सांगितले आहे. त्यामुळे केंद्राकडे मदत मागण्यात काही गैर नाही असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.सध्या पडणा-या या पावसाबद्दल एका ७२ वर्षाच्या शेतकऱ्याने सांगितले की, त्याच्या संपूर्ण आयुष्यात त्याने असा पाऊस पाहिलेला नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.
नुकसानग्रस्त शेतकरी,घरांची पडझड झालेले नागरिक यांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे राहील.कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. तुम्हाला दिलासा देण्यासाठी आम्ही आलो आहोत. तुम्ही सुरक्षित रहा,तुमची काळजी शासन घेईल,अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला.आज झालेल्या पत्रकार परिषदेपूर्वी मुख्यमंत्री ठाकरे यांनी अक्कलकोट तालुक्यातील रामपूर येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या.मुख्यमंत्री ठाकरे यांनी रामपूर येथील पडझड झालेल्या घरांची पाहणी केली. प्रत्यक्ष पडझड झालेल्या घरात जाऊन नागरिकांना दिलासा दिला. शासन सर्वतोपरी मदत करणार आहे. हवामान खात्याने 22 आणि 23 तारखेपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. प्रत्येकाने स्वत:ची आणि आपल्या कुटुंबाची, पशुंच्या जीवांची काळजी घ्यावी. शासन तुमची काळजी घेईल, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य शासन ठोस उपाययोजना करेल.रमेश बिराजदार हा शेतकरी तब्बल 24 तास झाडावर आणि पाण्यात होता. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) जवानांनी त्यांना बाहेर काढले होते. मुख्यमंत्री ठाकरे यांनी बिराजदार यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. उपचार घेतले का, तुम्हाला आता काही त्रास होतोय का, अशी विचारणा त्यांनी केली. यावर शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले होते.रडत रडतच त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या.
यावेळी नुकसानग्रस्त रमेश बिराजदार, लक्ष्मण कोणदे, शोभा बिराजदार, नागेंद्र बिराजदार, चन्नव्वा वाघमारे यांना प्रातिनिधीक स्वरूपात मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते मदतीचे धनादेश देण्यात आले.ठाकरे यांनी बोरी नदीची पाहणी करून नुकसान झालेल्या भागाची त्वरित डागडुजी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.तहसीलदार अंजली मरोड यांनी पूरग्रस्त आणि बाधित झालेल्या कुटुंबांची माहिती दिली. रामपूर गावातील 50 टक्के रहिवाश्यांचे स्थलांतर करण्यात आले आहे. याठिकाणी बोरी नदीला पूर आल्याने 40 घरात पाणी घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर शेकडो एकर शेतीचेही नुकसान झाले आहे. बोरी नदीवरील पुलावर पाणी आल्याने गावाचा संपर्क तुटला होता. पुराच्या पाण्यात शेतकऱ्यांची सात जनावरे वाहून गेल्याने दगावली आहेत. तुरीच्या आणि सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहितीही मरोड यांनी दिली.