आरपीआयचा झेंडा हाती घेत अभिनेत्री पायल घोषची राजकारणात एन्ट्री

मुंबई नगरी टीम

मुंबई : दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप करत चर्चेत आलेली अभिनेत्री पायल घोष हिने आज आरपीआयमध्ये प्रवेश केला.केंद्रीय सामाजिक आणि न्याय राज्यमंत्री आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या उपस्थितीत पायलने पक्षप्रवेश केला.अनुराग कश्यपविरोधात लैंगिक शोषणाचा आरोप करत पायलने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तसेच या प्रकरणात आपल्याला न्याय मिळावा यासाठी तिने थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडेही धाव घेतली होती. या सर्व घडामोडीत रामदास आठवले यांनी पायलला जाहीर पाठिंबाही दर्शवला होता. तर आज तिने आरपीआयचा झेंडा हाती घेत राजकारणात एन्ट्री घेतली आहे.

यासाठी रामदास आठवले यांनी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी पायल घोषसह अभिनेत्री कनिष्का सोनी, बिल्डर योगेश करकेरा,उद्योजक अंकुर चाफेकर यांनी आरपीआयमध्ये प्रवेश केला आहे. रामदास आठवले यांनी पायलवर अन्याय झाला असल्याचे पत्रकार परिषदेत म्हटले.पायलने वर्सोवा पोलीस ठाण्यात अनुराग कश्यपविरोधात तक्रार दाखल केली होती. तिच्यावर अन्याय झाल्याने आपण तिची बाजू घेतली. पोलिसांकडून अजूनही अनुरागला अटक झालेली नाही. त्याच्याविरोधात कोणतीही कारवाई केली नाही. या सर्व प्रकरणात आम्ही पायल सोबत आहोत, असे आठवलेंनी म्हटले.

आपल्याला पाठिंबा दिल्याने पायलने रामदास आठवलेंचे आभार मानले. रामदास आठवले यांनी नेहमीच महिलांना पाठिंबा दिला आहे.त्यामुळेच आपण आरपीआयमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. जेव्हा गरज वाटेल तेव्हा मी पक्षाच्या माध्यमातून देशासाठी काम करेन, असे पायल घोषने म्हटले आहे. दरम्यान, अभिनेत्री कंगना राणावत प्रकरणावेळी देखील रामदास आठवले यांनी कंगनाच्या घरी जाऊन तिला पाठिंबा दर्शवला होता. तसेच कंगना राजकारणात आली तर तिने आरपीआयमध्ये यावे, असे इच्छा आठवलेंनी व्यक्त केली होती. तर याआधी २०१४ साली अभिनेत्री राखी सावंत हिने देखील आरपीआयमध्ये प्रवेश करत निवडणुकीवेळी घराघरात जाऊन प्रचार केला होता. मात्र अगदी कमी वेळातच राखीने आरपीयमधून काढता पाय घेतला होता. तर आता पायल घोष आपली राजकीय वाटचाल कशी करेल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Previous articleउपमुख्यमंत्री अजित पवारांना कोरोनाची लागण
Next articleकोरोनाची चाचणी झाली स्वस्त ; आता केवळ ९८० रूपये मोजावे लागणार