संजय राऊतांची रामदास आठवलेंवर घणाघाती टीका

मुंबई नगरी टीम

मुंबई : हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणावरुन देशात संतापाची लाट उसळी असून राजकारण देखील चांगलेच तापले आहे. या प्रकरणावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी रिपाइचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. हाथरस घटनेतील पीडित मुलगी मृत्यूशी झुंज देत होती तेव्हा आठवलेंना महिलांवरील अत्याचार दिसले नाहीत. हाथरस घटना घडली तेव्हा आठवले नट्यांच्या घोळक्यात भलतेच उद्योग करीत होते, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

“रामदास आठवले हे सध्या विनोदाचा विषय बनले आहेत. आठवले कंगना राणावतला घरी जाऊन भेटले, तर त्यांचे कार्यकर्ते आधी विमानतळावर तिच्या स्वागतासाठी पोहोचले, पायल घोष या नटीला घेऊन ते राज्यपालांकडे भेटायला गेले. मात्र, हाथरसची एक दलित मुलगी मृत्यूशी झुंज देत होती, तिच्यावर अत्याचार झाला, तेव्हा आठवले नट्यांच्या घोळक्यात भलतेच उद्योग करीत होते. देशातील दलित चळवळ आणि आंबेडकरी विचारांचा हा विध्वंस आहे,” असं संजय राऊत म्हणाले.

यावेळी त्यांनी कंगना आणि भाजपवर जोरदार टीका केली. मुंबईत एका नटीचे बेकायदेशीररित्या बांधलेले कार्यालय तोडले म्हणून ज्या लोकांना न्याय, अन्याय, महिलांवरील अत्याचाराच्या उचक्या लागलेल्या ते सर्व आता पीडित मुलीच्या बेकायदेशीर पेटवलेल्या चितेबाबत थंड आहेत. ‘बेटी बचाव’ वाल्यांच्या ढोंगी रामराज्यात एक बेटी ‘बचाव बचाव असा आक्रोश करीत तडफडून मेली. या पीडित मुलीला न्याय मिळावा म्हणून सुशांतसाठी जे आंदोलन चालवले तसे कोणी प्रखर आंदोलन चालवले नाही. नटी कंगनाच्या घरावर हातोडा पडताच ‘काय हा अन्याय’ असे बोंबलणारा ‘मीडिया’ देखील कंठशोष करताना दिसला नाही. का? ती एक साधी सरळ मुलगी होती. म्हणून तिच्या देहाची रात्रीच्या अंधारात बेकायदेशीर अंत्यसंस्कार करण्यात आले. हे सर्व योगींच्या रामराज्यात म्हणजे उत्तर प्रदेशात घडले. अशा घटना अधूनमधून पाकिस्तानात घडत असतात. हिंदूंच्या मुलींना जबरदस्तीने पळवून, बलात्कार करून त्यांना मारुन फेकले जाते. हाथरसला वेगळे काय घडले? परंतु हाथरसला कोणी ‘पाकिस्तान’ म्हटल्याचे अजून तरी दिसले नाही, असा टोला संजय राऊत यांनी कंगनाला लगावला.

Previous articleमुंबई आणि पोलिसांची बदनामी करणाऱ्याबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा
Next articleहवं तर आम्ही भाजपमध्ये प्रवेश करू,ठाकरे सरकार मधील राज्यमंत्र्यांचे मोठे विधान