केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि खासदार सुनिल तटकरे यांना कोरोनाची लागण

मुंबई नगरी टीम

मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे.याची माहिती त्यांनी समाज माध्यमातून दिली आहे.आठवले यांची प्रकृती उत्तम असून खबरदारीचा उपाय म्हणून ते चार दिवस मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल होणार आहेत.महत्त्वाचे म्हणजे अभिनेत्री पायल घोष हिने सोमवारी रामदास आठवले यांच्या उपस्थितीत आरपीआयमध्ये प्रवेश केला.यावेळी रामदास आठवले यांनी पत्रकार परिषद देखील घेतली होती.त्यानंतर आज आठवले यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आठवले यांच्या संपर्कात आलेल्यांची चिंता वाढली आहे.

दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप करत चर्चेत आलेली अभिनेत्री पायल घोष हिने सोमवारी आरपीयआयमध्ये प्रवेश केला.पायल घोषसह अभिनेत्री कनिष्का सोनी,बिल्डर योगेश करकेरा, उद्योजक अंकुर चाफेकर यांनी देखील आरपीआयमध्ये प्रवेश केला.यावेळी पत्रकार परिषदेचे आयोजन करत रामदास आठवलेंनी पायलवर अन्याय झाला असून आपण तिला पाठिंबा देणार असल्याचे म्हटले होते. या दरम्यान आरपीआय कार्यकर्त्यांसह काही पत्रकार देखील उपस्थित होते. अशात आज रामदास आठवले यांना कोरोनाची लागण झाली आहे.तर आपल्या संपर्कात आलेल्या लोकांना काळजी घेण्याचे आवाहन आठवले यांनी केले आहे.

दरम्यान,राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी देखील काल कोरोनाची चाचणी केली होती. त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे.सध्या मुंबईतील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोरोना पॉझिटिव्ह असून त्यांच्यावर सेंट जार्ज या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.यासह राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाल्यानंतर त्यांना सोमवारी ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Previous articleराज्यपाल नियुक्त सदस्यांच्या १२ जागांसाठी उद्याचा मुहूर्त ? या नावांची चर्चा
Next articleकांदा उत्पादक शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचा डाव ; छगन भुजबळांचा घणाघात