विधानपरिषद निवडणूकीच्या निमित्ताने महाविकास आघाडी विरूद्ध भाजप सामना रंगणार

मुंबई नगरी टीम

मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे सुमारे चार महिने लांबणीवर पडलेल्या विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी येत्या १ डिसेंबर रोजी मतदान होणार असून,३ पदवीधर आणि २ शिक्षक मतदार संघाच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा आज केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे.या निवडणूकीच्या निमित्ताने महाविकास आघाडी विरूद्ध भाजप असा सामना रंगणार आहे.तिन्ही पक्षांची असलेली एकी पाहता भाजपला या निवडणूका जड जाण्याची शक्यता आहे.

१९ जूलै २०२० रोजी विधान परिषदेतील तीन पदवीधर तर दोन शिक्षक मतदार संघातील संदस्यांची मुदत संपली आहे. मात्र राज्यात असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या निवडणूका लांबणीवर पडल्या होत्या.त्या मध्ये औरंगाबाद पदवीधर,पुणे पदवीधर,नागपूर पदवीधर तर अमरावती आणि पुणे शिक्षक मतदार संघांचा समावेश आहे.औरंगाबाद पदवीधर मतदार संघातून राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण,पुणे पदवीधर मतदार संघातून भादपचे चंद्रकांत पाटील,नागपूर पदवीधर मतदार संघातून भाजपचे अनिल सोले,अमरावती शिक्षक मतदार संघातून अपक्ष आमदार श्रीकांत देशपांडे आणि पुणे शिक्षक मतदार संघातून अपक्ष आमदार दत्तात्रय सावंत हे प्रतिनिधित्व करीत होते.आज केंद्रीय निवडणूक आयोगाने या मुदत संपलेल्या ५ जागांसाठी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे.त्यानुसार या निवडणूकांची अधिसूचना येत्या ५ नोव्हेंबर रोजी जारी करण्यात येईल.तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १२ नोव्हेंबर आहे.१३ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येईल तर १७ नोव्हेंबर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.या निवडणूकांसाठी १ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणूकीची मतमोजणी ३ डिसेंबरला करण्यात येणार आहे.या निवडणूकीत कोरोना विषय नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येणार आहे.

नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणूका या बिनविरोध पार पडल्या होत्या त्यानंतर या पाच मतदार संघाच्या होणा-या निवडणूकीच्या निमित्ताने महाविकास आघाडी विरूद्ध भाजप असा सामना रंगणार आहे.औरंगाबाद पदवीधर मतदार संघ हा राष्ट्रवादीच्या वाट्याला जाईल तर पुणे पदवीधर मतदार संघावर राष्ट्रवादी दावा सांगण्याची शक्यता आहे.नागपूर पदवीधर आणि अमरावती,पुणे शिक्षक मतदार संघ काँग्रेस आणि शिवसेनेच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. या संदर्भात लवकरच महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. त्यामध्ये मतदार संघ वाटपाचा निर्णय घेतला जाणार आहे.विधान परिषदेच्या निवडणूकीनंतर या पाच मतदार संघातील निवडणूकीच्या निमित्ताने महाविकास आघाडी विरूद्ध भाजप असा रंगतदार सामना रंगणार आहे.मजबूत महाविकास आघाडी समोर भाजप आणि मित्र पक्ष अशी लढत होणार आहे.पुणे पदवीधर मतदार संघ वगळता सध्यातरी महाविकास आघाडीचे पारडे जड असल्याचे स्पष्ट चित्र आहे.

Previous articleआजपासून कोल्हापूर जिल्ह्यात “फक्त एकच गट तो म्हणजे उद्धव गट”
Next articleविद्यार्थी- पालकांची कृष्णकुंजवर धाव,राज ठाकरेंचा थेट शिक्षणमंत्र्यांना फोन