मुंबई नगरी टीम
जळगाव : माजी मंत्री एकनाथ खडसे हे भाजपमधून बाहेर काय पडले आणि पक्षात गळतीच सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यानंतर एकनाथ खडसे हे भाजपला एका पाठोपाठ एक हादरे देतच आहेत. खडसेंनी आज चक्क भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघालाच सुरुंग लावला आहे. जामनेरमधील तब्बल दीडशेहून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली मुक्ताईनगरमध्ये कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी जळगाव जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, खडसेंच्या कन्या रोहिणी खडसेही उपस्थित होत्या. एकनाथ खडसे राष्ट्रवादीत गेल्यापासून भाजपमध्ये आऊटगोइंग आणि राष्ट्रवादीत मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू झाले आहे. सोमवारी देखील रावेर तालुक्यातील भाजपच्या जवळपास 60 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आजही मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
दरम्यान, भाजपमधील ही गळती सुरू असताना देखील पक्ष सोडून कुणी जाणार नाही, असा दावा गिरीश महाजन यांनी केला होता. जे हौशे-गवशे असतील तेच भाजप सोडून जातील, असा टोलाही त्यांनी एकनाथ खडसे यांना लगावला होता. पंरतु एकनाथ खडसे हे एका पाठोपाठ एक धक्के भाजपला देतच आहेत. उत्तर महाराष्ट्र राष्ट्रवादीमय करून दाखवून, असा शब्द एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना दिला आहे. त्या दिशेनेच एकनाथ खडसेंनी आपला प्रवास सुरू केल्याचे बोलले जात आहे.