मुंबई नगरी टीम
मुंबई : अखेर महाविकास आघाडी सरकारने विधान परिषदेवर नियुक्त करावयाच्या राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर केली आहे.ही यादी राज्यपालांकडे सादर करण्यापूर्वी संपूर्ण कायदेशीर बाबी तपासण्यात आल्या असून,राष्ट्रवादीकडून माजी मंत्री एकनाथ खडसे,गायक आनंद शिंदे तर शिवसेनेकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना संधी दिली असल्याचे सांगण्यात येते.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत विधान परिषदेवर पाठवायच्या राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची यादी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर केली.परिवनह मंत्री अनिल परब आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी राजभवनावर जावून ही यादी राज्यपालांना सादर केली.महाविकास आघाडीकडून ही यादी सादर केल्यानंतर आता राज्यपाल याबाबत कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.यावेळी या तिन्ही मंत्र्यांनी आपआपल्या पक्षाच्या कोट्यातील राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी राज्यपालांना सादर करून राज्यपालांशी चर्चा केली.या वेळी या मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पत्र आणि मंत्रिमंडळाने केलेला ठराव यासह कायदेशीर बाबी नमूद करुन राज्यपालांना विनंती पत्र दिले आहे.
आज राज्यपालांना सादर करण्यात आलेली यादी लवकरात लवकर मंजूर होईल असा विश्वास यावेळी परिवहन मंत्री अनिल परब व्यक्त केला.आम्ही सगळ्या कायदेशीर बाबींची पूर्तता करुन राज्यपालांना यादी सादर केली आहे,त्यामुळे राज्यपाल या यादीवर शिक्कामोर्तब करतील असेही यावेळी परब यांनी सांगितले.राज्यपाल यादी मंजूर करतील की नाही हा जर तरचा प्रश्न आहे. त्यावर आताच भाष्य करणे योग्य नाही, आम्ही सर्व बाबींची पूर्तता करून यादी दिली आहे.त्यामुळे राज्यपाल त्यावर शिक्कामोर्तब करतील अशी आशा नवाब मलिक यांनी व्यक्त केली.राज्यपालांना सादर करण्यात आलेल्या यादीत कोणाची नावे आहेत याचा खुलासा करण्यात आलेला नसला तरी राष्ट्रवादीकडून माजी मंत्री एकनाथ खडसे,(समाजसेवा-सहकार),गायक आनंद शिंदे (कला),मराठवाड्यातील धनगर समाजाचे नेते यशपाल भिंगे (साहित्य) आणि शेतकरी नेते राजू शेट्टी,(सहकार-समाजसेवा) यांच्या नावाचा समावेश आहे.काँग्रेसकडून रजनी पाटील ( सहकार ),अनिरूद्ध वनकर ( कला),सचिन सावंत ( समाजसेवा),मुजफ्फर हुसेन ( समाजसेवा),यांच्या नावांचा समावेश असल्याचे समजते तर शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर ( कला), नितीन बानगुडे ( शिव व्याख्याते), विजय करंजकर ( समाजसेवा), चंद्रकांत रघुवंशी ( सहकार) यांच्या नावांचा समावेश असल्याचे सांगण्यात येते.