पोलीस महासंचालक ठाकरे सरकारला कंटाळून केंद्रात जाणार : चंद्रकांत पाटलांची टीका

मुंबई नगरी टीम

मुंबई : महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल हे लवकरच केंद्रीय सेवेत रुजू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर टीकेची तोफ डागली आहे. राज्यातील गेल्या काही महिन्यांमधील घटनांमुळे जयस्वाल यांच्या भावनांना धक्का पोहोचला आहे. त्यामुळे जयस्वाल यांनी केंद्रात जाण्याचा निर्णय घेतला, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. आता राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ईश्वराच्याच हातात, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे.चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरद्वारे सरकारला लक्ष्य केले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत म्हटले की, “आता काही वेळापूर्वीच एक धक्कादायक आणि दुःखद बातमी वाचली. राज्याचे सर्वोच्च पोलीस अधिकारी आणि महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल हे आपल्या पदावरून पायउतार होऊन केंद्रीय सेवेत जाणार आहेत. येणाऱ्या काळात देशाच्या पराक्रमी अशा राष्ट्रीय सुरक्षा बल (एनएसजी) च्या सर्वोच्च पदी विराजमान होणार आहेत, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे”, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. राज्यातील गेल्या काही महिन्यांमधील घटनांमुळे जयस्वाल यांच्यासारख्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या भावनांना धक्का पोहोचला आहे.

या महाभकास आघाडीच्या सरकारने सर्व धोरणांना बाजूला सारून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत, असा आरोपही त्यांनी केला. भारताची गुप्तचर संघटना ‘रॉ’मध्ये काम केल्यानंतर सर्वप्रथम २०१८ साली जयस्वाल यांनी मुंबई पोलीस आयुक्ताचा पदभार सांभाळला. मात्र पोलीस दलाला मजबूत करण्यासाठी जयस्वाल यांच्या सर्व सूचना आणि उपाययोजना सरकार धुडकावून लावत होती. याशिवाय त्यांच्या शिफारसीच्या विरुद्ध पूर्वीच्या ज्या पोलिसांना निलंबित केले गेले होते त्यांनाही पुन्हा पदावर नेमले गेले. त्यामुळे सरकारच्या या बहिऱ्या आणि कुचकामीपणामुळे जयस्वाल हे राज्य सोडून केंद्रात जात असल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तसेच जयस्वाल यांच्यासारखा सक्षम अधिकारी जाणे म्हणजे आमच्या राज्याच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी हा फारच घातक दिवस आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये राज्याची कायदा आणि सुव्यवस्था ईश्वराच्याच हातात असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

Previous articleभाषणातून सांगायचं “शिवसैनिक माझा श्वास आहे” नंतर शिवसैनिक ‘फाट्यावर’
Next articleकोकणातून शिवसेना हद्दपार करू म्हणणाऱ्या नारायण राणेंना आत्मपरीक्षणाची गरज