कोकणातून शिवसेना हद्दपार करू म्हणणाऱ्या नारायण राणेंना आत्मपरीक्षणाची गरज

मुंबई नगरी टीम

सिंधुदुर्ग : कोकणात शिवसेनेच्या ११ पैकी एकही आमदार निवडून येणार नाही.सर्वांना घरी बसावे लागेल, असा दावा भाजप खासदार नारायण राणे यांनी केला होता.यावरून राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. शिवसेनेचा एकही आमदार निवडून येणार नाही, असे म्हणणे हा राणेंचा विनोद आहे. त्यांना सध्या आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असे म्हणत उदय सामंत यांनी राणेंना फटकारले.

यावर अधिक बोलताना उदय सामंत म्हणाले, आम्ही सर्व तीन ते चारवेळा निवडून आलेलो शिवसेनेचे प्रतिनिधी आहोत.राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक घ्यायची हे भाजपचे आव्हान फार छोटे आहे, असे म्हणत त्यांनी राणेंनाच एक प्रकारे आव्हानच दिले आहे. मी सर्वसामान्य ग्रामपंचायत सदस्यांनाही हलक्यात घेत नाही. राणेंना तर मुळीच घेणार नाही. परंतु आम्हाला आव्हान देणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. ज्यांना कोकणवासीयांनी नाकारले त्यांच्याबद्दल बोलून मला त्यांना मोठे करायचे नाही, असा टोलाही त्यांनी राणेंना लगावला.

दरम्यान, ३ नोव्हेंबरला भाजपची जिल्हा कार्यकारिणीच्या बैठक पार पडली होती. त्यानंतर पत्रकार परिषदेत संवाद साधताना, कोकणातून शिवसेना हद्दपार करू, अशी गर्जना नारायण राणे यांनी केली होती. आगामी विधानसभा निवडणुकीत अकरापैकी शिवसेनेचा एकही आमदार निवडून येणार नाही. सर्वांना घरी बसवले जाईल, असे आव्हान नारायण राणे यांनी दिले होते. महाविकास आघाडी सरकारला खाली उतरवण्यासाठी आणि शिवसेनेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तडीपार करण्यासाठी भाजपने कार्यक्रम आखला आहे, असेही त्यांनी सांगितले होते.

Previous articleपोलीस महासंचालक ठाकरे सरकारला कंटाळून केंद्रात जाणार : चंद्रकांत पाटलांची टीका
Next articleआरेच्या जागेचा व्यावसायीक उपयोग करण्याचाच फडणवीस सरकारचा डाव होता