मुंबई नगरी टीम
मुंबई : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपच्या केंद्रीय समितीकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून शिरीष बोराळकर तर पुणे पदवीधरसाठी संग्राम देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकांसाठी भाजपने महाराष्ट्रातील चार तर उत्तर प्रदेशातील नऊ जागांवर उमेदवार घोषित केले आहेत.
पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपने संग्राम देशमुख यांना उमदेवारी दिली आहे.संग्राम देशमुख हे सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत. नागपूर पदवीधर मतदारसंघातून विद्यमान महापौर संदीप जोशी यांना संधी देण्यात आली आहे. औरंगाबाद – पदवीधर मतदारसंघातून शिरीष बोराळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिरीष बोराळ हे पंकजा मुंडे यांचे समर्थक आहेत.दरम्यान, पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा असून त्यांच्या समर्थकाला तिकीट देऊन पंकजा यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजपकडून होत असल्याचे दिसत आहे. अमरावती – शिक्षक मतदारसंघातून नितीन धांडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान, एकीकडे भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. तर दुसरीकडे पदवीधर आणि शिक्षक विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरूच आहे. निवडणुका जाहीर झाल्या तरी, अद्याप जागा वाटपाबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. १२ तारखेला अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेते चर्चा करून लवकरच यावर निर्णय घेण्याची शक्यता आहे.