दिवाळीत बेसावध राहिलो तर.. ! मुख्यमंत्र्यांनी दिला गंभीर इशारा

मुंबई नगरी टीम

मुंबई : दीपावलीच्या शुभेच्छा देताना सणाचा जरूर आनंद घ्या पण आरोग्याच्या जबाबदारीचे भान ठेवा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना केले आहे. आपण स्वत: देखील केवळ सोशल मीडिया, ईमेलद्वारे शुभेच्छा स्वीकारणार असून भेटीगाठी न करता अतिशय सुरक्षितपणे, घरच्याघरी हा सण साजरा करणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्री आपल्या आवाहनात म्हणतात की,कोरोनाला सणवार -दिवाळी कळत नाही. लस जेव्हा येईल आणि आपल्यापर्यंत पोहचेल तोपर्यंत स्वत:ला सुरक्षित ठेवणे आणि घरातले-बाहेरचे यांनाही संसर्ग होऊ न देणे हे आपले प्राधान्य असले पाहिजे.गेल्या सात आठ महिन्यात आपण सर्व धर्मियांचे सण, उत्सव अतिशय सावधपणे आणि नियमांचे पालन करून साजरे केले आहेत. आपण जो संयम पाळला आहे त्याचाच परिणाम म्हणून आपण या महामारीला इतक्या महिन्यानंतरही रोखून धरण्यात यशस्वी झालो आहोत, हे विसरू नका.

युरोपमधील देशांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेमुळे गंभीर परिस्थिती निर्माण होते आहे.त्याठिकाणी रुग्ण झपाट्याने वाढत असून त्यांच्यासाठी रुग्णालयांची साधन सामग्री,वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर्स कमी पडताहेत.दिवाळीत आपण बेसावध राहिलो तर पुढच्या काळात आपल्याकडेही रुग्णसंख्या बेसुमार वाढून खूप कठीण आव्हान बनेल हे ध्यानी घ्या असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, एकीकडे दिवाळीचा आनंद आपण घेणार असलो तरी दुसरीकडे हजारो डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस हे सणवार विसरून कोरोनाशी लढताहेत, तुमचा -आपला सर्वांचा जीव कसा सुरक्षित ठेवायचा ते पाहताहेत हे कृपया विसरू नका एवढीच विनंती. त्यांची दिवाळी रुग्णालयांमध्ये आणि कर्तव्य बजावताना जाणार आहे. या कर्मचाऱ्यांत आपली आई, वडील, भाऊ बहिण, नातेवाईक,मित्र कुणीही असू शकते. त्यांच्यावरचा ताण न वाढू देणे आणि घरातच राहून सुरक्षितरीत्या दिवाळी साजरे करणे याला प्राधान्य द्या.

हा सण मोठा असला तरी आपल्या परिसरात, आपल्या जवळचे, मित्रमंडळी- नातेवाईक यांच्या घरात कोरोनामुळे दु:खद घटना घडलेली असेल, त्यांना या दिवाळीचा आनंद घेता येणार नाही त्यामुळे उत्साह दाखवतांना त्यांचाही विचार मनात राहू द्या, असेही मुख्यमंत्री म्हणतात.आपल्याला दिवाळीनंतर शाळा, महाविद्यालये सुरु करायचे आहेत. पूर्ववत आयुष्य जगायचे आहे. त्यामुळे या दिवाळीतही मास्क घालणे- हात धुणे- अंतर पाळणे ही त्रिसूत्री पाळा आणि आता हिवाळा असल्याने श्वसन रोगाला आमंत्रण देऊ नका, आपले आई वडील, ज्येष्ठ मंडळी घरात आहेत याची जाणीव ठेवा. फटाके वाजविणे आणि बाहेरच्या भेटीगाठी यापेक्षा घरातच कुटुंब एकत्रितरीत्या हा सण साजरा करू शकते. हा दीपोत्सव असल्याने दिव्यांची आरास, रांगोळ्या, ज्यांना शक्य आहे त्यांना अंगणात किल्ले करणे, या काळात सुट्या असल्याने वाचन करणे, संगीत तसेच इतर आवड पूर्ण करा. तुमच्या घराचे दरवाजे मंगलमय शांती, समृद्धी, लक्ष्मी यांच्यासाठी उघडा, कोरोनासारख्या रोगासाठी नव्हे असे देखील मुख्यमंत्री म्हणतात.

Previous articleस्वतःचा कचरा कसा करायचा यामध्ये शिवसेनेने पीएचडी केलीय
Next articleही ‘श्रींची इच्छा! सोमवारपासून राज्यातील मंदिरे,प्रार्थनास्थळे उघडणार