मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यपाल नियुक्त विधान परिषदेवरील १२ सदस्यांच्या नावाचा मंत्रिमंडळाने पाठवलेल्या प्रस्तावावर राज्यपालांकडून अद्यापही मंजूरी आलेली नाही. अशातच रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आणि माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत आपल्याकडील १२ सदस्यांची यादी दिली आहे.रयत क्रांतीकडून राज्यपाल कोट्यातील जागेसाठी १२ नावे सुचवण्यात आली असून यासंदर्भात भगतसिंह कोश्यारी यांना पत्र दिल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले. या घडमोडीनंतर महाविकास आघाडीच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे.
राज्यपालांच्या भेटीनंतर सदाभाऊ खोत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपण सुचवलेल्या नावांचा खुलासा केला. अभिनेते मकरंद अनासपुरे, डॅा.तात्याराव लहाने ( सामाजिक कार्य व आरोग्य सेवा ), डॅा.प्रकाश आमटे (सामाजिक कार्य), क्रिकेटर झहीर खान, निवृत्ती महाराज इंदोरीकर ( सामाजिक कार्य व प्रबोधन), अमर हबीब (सामाजिक कार्य व पत्रकार),मंगलाताई बनसोडे ( कला ), विश्वास पाटील (लेखन व साहित्यिक),पोपटराव पवार (सामाजिक कार्य), विठ्ठल वाघ (लेखन व साहित्यिक), बुधाजीराव मुळीक (विज्ञान व शेती विषयाचे गाढे अभ्यासक) ,सत्यपाल महाराज (सामाजिक कार्य व प्रबोधन) आदी नावांचा यादीत समावेश असून ती विधान परिषदेसाठी सुचवण्यात आली आहेत. दरम्यान ठाकरे सरकारकडून देण्यात आलेल्या सदस्यांच्या नावावर १५ दिवसांत निर्णय द्यावा,अशी विनंती महाविकास आघीडीतील नेत्यांनी केली होती. मात्र १५ दिवस होऊनही राज्यपालांनी या नावांबाबत निर्णय जाहीर केलेला नाही. त्यात आता सदाभाऊ खोतांनीही १२ नावे दिल्याने राज्यपाल नेमकी काय भूमिका घेतात याची उत्सुकता लागून आहे.
यावेळी सदाभाऊ खोत यांनी राज्यपालांकडे अन्य काही मागण्या देखील केल्या आहेत. यामध्ये वाढीव वीज बिल माफी, ओला दुष्काळ, अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांना आर्थिक मदत, कोविड काळात अत्यावश्यक सेवेदरम्यान मृत्यू पावलेल्या कर्मचा-यांच्या कुटंबीयांना ५० लाखांची मदत अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान राज्यपाल नियुक्त रिक्त जागांसाठी साहित्य, कला, सहकार क्षेत्र, सामाजिक कार्य या क्षेत्रांतील प्रसिद्ध लोकांची विधान परिषदेवर नेमणूक केली जाते. सदाभाऊ खोत यांनी दिलेली नावे या क्षेत्रांशी निगडीत असून त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा,अशी विनंती त्यांनी राज्यपालांकडे केली आहे.