मुंबई नगरी टीम
पुणे : मोकळी भांडी फार वाजतात. त्यामुळे भांड्यांनी करायचा तितका आवाज करा. सरकार पडले तर बघू काय करायचे ते, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. तसेच हे सरकार स्थिर आहे आणि टिकणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पदवीधर-शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक प्रचारासाठी पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरात सुप्रिया सुळे आल्या होत्या. यावेळी त्यांनी सरकार पडणार असे दावे करणाऱ्या विरोधकांना टोला लगावला.
लोकं सारखे म्हणतात की, हे सरकार पडणार. हे ऐकताना मला गंमत वाटते. मोकळी भांडी फार वाजतात. त्यामुळे भांड्यांनी करायचा तितका आवाज करा. सरकार पडले तर बघू काय करायचे ते, हे सरकार स्थिर आणि टिकणारे आहे, असे त्या म्हणाल्या. शिवाय आयुष्यभर सत्तेत राहण्यासाठी कोणी आलेले नाही. आज आम्ही सत्तेत आहोत कधीतरी त्यांची येईल. पण ती लवकर येणार नाही, असेही त्या म्हणाल्या. महाविकास आघाडीचे सरकार लवकरच पडणार अशी टीका विरोधकांकडून केली जाते. मात्र महाविकास आघाडीने एक वर्ष पूर्ण केले असून पुढील चार वर्षही पूर्ण करणार, असे प्रत्युत्तर सत्ताधारी नेते देत आहेत.
यावेळी सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याविषयी देखील भाष्य केले. पंतप्रधान मोदी हे शनिवारी पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला भेट देण्यासाठी येणार आहेत. आपल्या सरकारला एक वर्ष होणार आणि देशाचे पंतप्रधान आपल्या जिल्ह्यातल्या ठिकाणी काम होत आहे हे पाहण्यासाठी येणार याहून मोठे यश आपल्या सरकारचे काय असेल?, असे म्हणत त्यांनी आनंद व्यक्त केला. दरम्यान, कोरोना प्रतिबंधक लसीकडे जगाचे लक्ष लागले आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि सिरम इन्स्टिट्यूटद्वारे कोविडशिल्ड ही लस तयार केली जात असून ती अंतिम टप्प्यात आहे. याचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी पुण्याचा दौरा करणार आहेत.