मुंबई नगरी टीम
मुंबई : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात शेतक-यांनी उद्या ८ डिसेंबरला भारत बंदची हाक दिली आहे.या भारत बंदला राज्यातील महविकास आघाडी सरकारचा पाठिंबा असेल,असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले हा बंद राजकीय नसून तो फार वेगळा आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांनी या बंदला पाठिंबा जाहीर केला असल्याचे ते म्हणाले. संजय राऊत यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शेतकरी आंदोलनासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली.
“शेतक-यांच्या आंदोलनाला त्यांनी पुकारलेल्या भारत बंदला शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी या भारत बंदला पाठिंबा दिला असल्याचे जाहीर केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अशी भूमिका आहे की, हा बंद फार वेगळ्या प्रकारचा बंद आहे. शेतकरी हा संकट काळातही शेतात राबत असतो. आपण सगळे लाॅकडाऊनमध्ये घरी बसलेले होतो, तेव्हा शेतकरी राबत होता. आपले कर्तव्य बजावत होता. आज त्याने आपल्याला साद घातली आहे, त्याला गरज आहे. आपण सर्वांनी त्याच्या पाठीशी उभे राहायला हवे, त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला पाहिजे”, अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली.
“जनतेने स्वेच्छा, संस्कृतीने या बंदमध्ये सहभागी व्हावे. हा ख-या अर्थाने त्या बळीराजाला पाठिंबा ठरेल. हा राजकीय बंद नाही. एखाद्या राजकीय पक्षाच्या, संघटनेच्या मागण्या मान्य करण्यासाठी पुकारलेला हा बंद नाही. देशातील शेतकऱ्यांचा आवाज बुलंद व्हावा, यासाठी हा बंद पाळावा”, असे आवाहन संजय राऊत यांनी केले आहे. शेतकरी गेल्या १२ दिवसापासून दिल्लीच्या सिमेवर थंडी, वाऱ्याची, केंद्राच्या दडपशाहीची परवा न करता रस्त्यावर उतरला आहे. त्याला समर्थन देणे देशाच्या प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे, असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दहा वर्षांपूर्वी कृषी क्षेत्रासंदर्भात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना एक पत्र लिहले होते. त्यावेळी शरद पवार हे केंद्रीय कृषीमंत्री होते.त्यांचे हे पत्र सध्याच्या शेतकरी आंदोनलादरम्यान पुन्हा चर्चेत आले आहे. यावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले की, २०११ साली शरद पवारांनी पत्र लिहले त्यावेळची परिस्थिती वेगळी असले आत्ताची वेगळी आहे. शरद पवार स्वतः कृषी क्षेत्रातील सर्वात मोठे तज्ज्ञ आणि अभ्यासक समजले जातात. त्यामुळे त्यांच्या पत्रासंदर्भात ते खुलासा करतील. ते शेतकरी नेते असल्याने शेतकऱ्यांच्या भावनांशी सहमत आहेत. लाखो शेतकरी रस्त्यावर उतरलेले असताना कोणताही नेता त्यांच्या भावनेशी प्रतारणा करणार नाही, असे संजय राऊत म्हणाले.