चंद्रकांत पाटील पंतप्रधान आहेत की कृषिमंत्री ? दादांच्या विरोधकांचा टोला

मुंबई नगरी टीम

कोल्हापूर : केंद्राने पारित केलेला कृषी कायदा रद्द होणार नाही, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठणकावून सांगितले होते. यावरून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील पंतप्रधान आहेत की कृषिमंत्री? असा बोचरा सवाल केला आहे. तसेच शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंद आंदोलनावेळी कडकडीत बंद पाळावा, असे आवाहनही हसन मुश्रीफ यांनी केले आहे. कृषी कायदा रद्द करण्यास विरोध करून भाजप हा शेतकरी हिताविरुद्ध आहे हे चंद्रकांत पाटील यांनी सिद्ध केले, अशी टीका गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी देखील केली आहे.

उद्या मंगळवारी ८ डिसेंबरला भारत बंदची हाक देण्यात आली असून या आंदोलनाला राज्यातील महाविकास आघाडीने पाठिंबा दर्शवला आहे. याबाबत बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले की, राज्यातील जनतेने अत्यावश्यक सेवा वगळून कडकडीत बंद पाळावा. हा बंद शांततेत पार पाडण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात आंदोलनाला तीव्रता नाही, असे म्हटले होते. यावरही हसन मुश्रीफ यांनी भाष्य केले. महाराष्ट्रात उसाला एफआरपी तसेच कापूस, तूर व इतर उत्पादनांना हमीभाव आहेत. शरद पवार कृषीमंत्री असताना त्यांनी यासंदर्भातील कायदे केलेले असल्याची आठवण यावेळी हसन मुश्रीफ यांनी करून दिली.

एकीकडे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला महाविकास आघाडीने पाठींबा दिला आहे. तर दुसरीकडे भाजप नेते या कृषी कायद्यांचे समर्थन करत आहेत. या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला. नव्या कृषी कायद्याच्या माध्यमातून शेतकऱ्याचे हित साधणार आहे, असे भाजप नेत्यांनी गळ्यात पक्षाचा मफलर घालून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सांगण्याची हिंमत दाखवावी. त्यावर शेतकरीच त्यांना पायातील काढून उत्तर देतील, अशा शब्दांत सतेज पाटील यांनी भाजप नेत्यांना सुनावले. या नव्या कृषी कायद्यातून शेतकऱ्यांचा कसलाही लाभ होणार नाही. अंबानीची जिओ कंपनी सुरू झाल्यावर सरकारी बीएसएनएल दूरध्वनी कंपनी कशी देशोधडीला लागली. तशीच अवस्था या कायद्यांमुळे शेतकऱ्यांची होणार असल्याचा आरोप सतेज पाटील यांनी केला आहे.

Previous articleमहाराष्ट्र ठप्प होणार : उद्याच्या भारत बंदला महाविकास आघाडीचा पाठिंबा
Next articleशेतक-यांच्या उद्याच्या भारत बंदला मनसेचा विरोध !