शेतक-यांच्या उद्याच्या भारत बंदला मनसेचा विरोध !

मुंबई नगरी टीम

मुंबई : शेतकऱ्यांच्या भारत बंद आंदोलनाला महाविकास आघाडीने पाठिंबा जाहीर केलेला असताना मनसेने याबाबत मोदी सरकारची बाजू घेतली आहे. सरकारने माघार घेतली तर शेतकरी पुन्हा भ्रष्टाचारी व्यवस्थेत भरडला जाईल. त्यामुळे सरकारने माघार घेऊन नये अन्यथा देशातील एकूण आर्थिक सुधारणांबाबत आपण दहा वर्ष मागे जाऊ, असे मत मनसे नेते अनिल शिदोरे यांनी मांडले आहे.अनिल शिदोरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून यासंदर्भात भाष्य केले आहे.त्यामुळे आता भाजपसह मनसेनेही या कृषी कायद्यांना समर्थन दर्शवत असल्याचे चित्र आहे.

“आपण वर्षानुवर्ष पाहिले की कृषी उत्पन्न बाजार समित्यांची मक्तेदारी हीच शेतकरी वर्गावर अन्याय करते आहे. त्याचा बिमोड करायचा म्हणून संसदेत तीन कृषी विषयक कायदे मंजूर झाले, आता इथून सरकारने माघार घेतली तर शेतकरी पुन्हा भ्रष्टाचारी व्यवस्थेत भरडला जाईल. सरकारने माघार घेऊ नये. “शेतीचे भले खुल्या बाजाराशी जोडले जाण्यात आहे. ती दिशा आहे. ज्या कायद्यांविरोधात दिल्लीत आंदोलन चालू आहे, ते कायदे त्याच दिशेने जाणारे आहेत. त्याच्या अंमलबजावणीच्या बाबतीत काही सुधारणा करता येतील परंतु आज माघार घेतली तर देशातील एकूण आर्थिक सुधारणांबाबत आपण दहा वर्ष मागे जाऊ”, असे ट्वीट अनिल शिदोरे यांनी केले आहे.

यावेळी अनिल शिदोरे यांनी आणखी एक ट्वीट करत थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. शरद पवार यांचे एपीएमसीला पाठिंबा देणारे पत्र समोर आले असून हाच धागा पकडून अनिल शिदोरे यांनी थेट खासदार सुप्रिया सुळे यांना सवाल केला आहे. “राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या “लोक माझे सांगाती..” ह्या पुस्तकात कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या नियंत्रणामुळे कसा अन्याय होतो आहे आणि हे नियंत्रण काढले पाहिजे असे म्हटले असल्याचे समजले. मी पुस्तक वाचलेले नाही पण हे खरे आहे का?”, असा प्रश्न विचारत त्यांनी सुप्रिया सुळे यांना टॅग केले आहे.
यासह मनसे नेते संदीप देशपांडे यांनी देखील शिवसेना खासदार संजय राऊत यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमी शेतकऱ्यांबरोबर होती, आहे आणि राहणार. पण आज आरडाओरडा करणारे राज्यसभेत मूग गिळून गप्प बसले होते? असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला. दरम्यान, मनसेच्या नेत्यांनी कृषी कायद्यावरून आपले मत मांडले असले तरी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांची नेमकी भूमिका काय असेल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Previous articleचंद्रकांत पाटील पंतप्रधान आहेत की कृषिमंत्री ? दादांच्या विरोधकांचा टोला
Next articleझोपी गेलेल्या केंद्र सरकारला जागे करा अशोक चव्हाण यांचे आवाहन