झोपी गेलेल्या केंद्र सरकारला जागे करा अशोक चव्हाण यांचे आवाहन

मुंबई नगरी टीम

मुंबई : केंद्र सरकारने पारित केलेले तीन नवे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या विरोधात असून, हे कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सिमेवर सुरू असलेल्या आंदोलनाला संपूर्ण देशाचा पाठिंबा आहे. शेतकऱ्यांच्या मागणी संदर्भात केंद्र सरकारने झोपेचे सोंग घेतले असून,त्यांना जागे करण्यासाठी ८ डिसेंबरचा ‘भारत बंद’ महत्वाचा आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांच्या सहकार्याने हे आंदोलन यशस्वी करून शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासंदर्भात केंद्रावरील दबाव वाढवावा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे. अशोक चव्हाण यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ पोस्ट करत आपली भूमिका मांडली आहे.

“गेल्या १२ दिवसांपासून देशातील अनेक शेतकरी दिल्लीत ठिय्या आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारने पारित केलेल्या शेतकऱ्यांच्या विरोधातील तीन नवीन कायदे मागे घेण्यासाठी सर्व आंदोलनात सहभागी झाले आहेत. या देशव्यापी आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केले आहे. केंद्र सरकार सामंजस्याची भूमिका घेताना दिसत नाही. शेतकऱ्यांशी केल्या जाणाऱ्या चर्चा निष्फळ ठरत आहेत. काहीही झाले तरी हे कायदे मागे घ्यायचे नाहीत, अशी ताठर भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे”, असे अशोक चव्हाण म्हणाले.

“दिल्लीत कडाक्याची थंडी असूनही लाखो शेतकरी बांधव एकत्र येऊन आंदोलन करत आहेत. ज्या कायद्यात हमी भावाची गॅरंटी नाही, ज्यामध्ये शेतकऱ्यांविरोधातील अनेक निर्णय आहेत, शेतकऱ्यांना मारक ठरणाऱ्या आणि उद्योगपतींना पोषक अशा तरतुदी या कायद्यात आहेत. अशा प्रकारचे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नाहीत हे निश्चित आहे. काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमी भूमिका घेतली आहे. हे कायदे पारित होऊ नये, अशी भूमिका काँग्रेसने संसदेत आणि बाहेर देखील घेतली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनीही शेतकऱ्यांना पाठिंबा देत हा कायदा रद्द व्हावा, अशी भूमिका वारंवार घेतली आहे”. झोपेचे सोंग घेतलेल्या केंद्र सरकारला जागे करण्यासाठी ८ तारखेचा भारत बंद महत्त्वाचा आहे, त्यासाठी सर्वांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन अशोक चव्हाण यांनी केले आहे.

Previous articleशेतक-यांच्या उद्याच्या भारत बंदला मनसेचा विरोध !
Next articleतब्बल ७ वर्षानंतर प्राध्यापकांना संप काळातील वेतन मिळणार;उदय सामंत यांचा मोठा निर्णय