मुंबई नगरी टीम
जालना : कोरोना विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी त्यावर प्रभावी ठरणा-या लसीची वाट सर्वजण पाहत आहेत.या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातही लवकरच लसीकरण होण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील महत्त्वाची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.केंद्राच्या धर्तीवर राज्यातही लसीकरणाची तयारी पूर्ण झाली आहे. आता केवळ केंद्राच्या परवानगीकडे लक्ष असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. कोरोना प्रतिबंधात्मक लस संपूर्ण राज्यभरात पोहोचवण्यासाठी सर्व कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे केंद्र आणि औषध महानियंत्रक यांच्या परवानगीकडे लक्ष असल्याचे ते म्हणाले. जालनामध्ये पत्रकारांशी ते बोलत होते.
राज्यातील लसीकरणाचा पहिला प्रयोग मुंबईतील केईएम रुग्णालयात केला जाणार आहे.त्यामुळे राज्यासह मुंबईकरांसाठी हि आनंदाची बाब आहे. यासंदर्भात अधिक बोलताना ते म्हणाले की, प्रत्येक राज्य शासनाने आणि केंद्र सरकारने वाहतूक आणि कोल्ड चेनची व्यवस्था करण्याची गरज आहे. हे काम महाराष्ट्रात जलद गतीने सूरू आहे. शिवाय अदर पूनावाला यांनी देखील राज्यात कोल्ड चेन, प्रशिक्षण आणि वाहतूकीबद्दल जे लक्ष्य दिले होते ते पूर्ण केले असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. यावेळी राजेश टोपेंनी रक्तदान करण्याचे देखील आवाहन केले आहे.
राज्यात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. पाच ते सहा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा असल्याची माहिती त्यांनी दिली. लॅाकडाऊनच्या काळात अनेक महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था बंद होत्या. त्यामुळे रक्तदान शिबिरे होऊ शकली नाहीत.म्हणून हा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे तरुणांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्यासाठी पुढे यावे.दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा १२ डिसेंबरला वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने रक्तदान करावे, असेही आवाहन राजेश टोपे यांनी केले आहे.
कोरोना लसीकरणाच्या तयारीचा मुख्य सचिवांकडून आढावा
कोरोना लसीकरणासाठी मुख्य सचिव संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय सुकाणू समितीची पहिली बैठक झाली. यावेळी राज्यात कोरोना लसीकरणासाठी सुरु असलेल्या तयारीचा आढावा मुख्य सचिवांनी घेतला. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदिप व्यास यांनी सादरीकरण केले.लसीकरणासाठी विविध स्तरावर समन्वय यंत्रणा करण्यात आली आहे. राज्यस्तरीय सुकाणू समितीनंतर राज्य कृती दल, राज्य नियंत्रण कक्ष, जिल्हास्तरावर जिल्हा कृती दल, जिल्हा नियंत्रण कक्ष, तालुकास्तरावर तालुका कृती दल आणि तालुका नियंत्रण कक्ष अशी यंत्रणा आहे.
लसीकरणासाठी प्राधान्यक्रम ठरविण्यात आला असून पहिल्या गटात शासकीय आणि खासगी दवाखान्यातील आरोग्यसेवक कर्मचारी, रोजंदारीवर काम करणारे कामगार आणि एकात्मिक बालविकास प्रकल्पातील कर्मचारी यांचा समावेश करण्यात आला आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी नऊ गटात वर्गीकरण करण्यात आले आहे.दुसऱ्या गटात फ्रंटलाईन वर्करचा समावेश असून त्यामध्ये राज्य आणि केंद्रीय पोलीस, सशस्त्र कृती दल, गृहरक्षक दल, नागरी सुरक्षा संस्थांमधील कर्मचाऱ्यांसह आपत्ती व्यवस्थापन स्वयंसेवकांचा आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. तिसऱ्या गटात ५० वर्षावरील आणि ज्यांना अन्य व्याधी आहेत अशा ५० वर्षाखालील व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे.लसीकरणासाठी राज्य शासनाने तयारी केली असून आतापर्यंत शासकीय आरोग्य संस्थेतील ९९ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांचा डेटा पूर्ण करण्यात आला आहे. तर खासगी आरोग्य संस्थेतील कर्मचाऱ्यांचा डेटा ७८ टक्के पूर्ण झाला आहे. लस टोचण्यासाठी १६ हजार २४५ कर्मचाऱ्यांची को-विन पोर्टलवर नोंदणी करण्यात आली आहे. आतापर्यंत को-विन पोर्टलवर ९० हजारांहून अधिक लाभार्थ्यांची नोंदणी झाली आहे. सुमारे दोन लाख ६० हजार शासकीय आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरण पथकामध्ये पाच सदस्यांचा समावेश असेल.
राज्यात शीतगृहांची उपलब्धता असून राज्यस्तरीय एक, विभागीय स्तरावर नऊ, जिल्हास्तरावर ३४, महामंडळांचे २७ असे शीतगृह तयार असून ३ हजार १३५ साखळी केंद्र उपलब्ध आहेत.कोरोना लसीकरणामुळे राज्यातील नियमित लसीकरण मोहिमेला बाधा येणार नाही याची खबरदारी घेण्यात आली असून कोरोनाच्या लसीकरण मोहिमेसाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करण्यात येत आहे. निवडणूक मतदान प्रक्रियेच्या धर्तीवर लसीकरण मोहीमेची अंमलबजावणी केली जाणार आहे. मतदानासाठी ज्याप्रकारे बुथ असतो तसे बुथ लसीकरणासाठी करण्यात येतील आणि लसीकरणाच्या यादीत नाव असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्याला त्या बुथमध्ये ओळखपत्र तपासून प्रवेश दिला जाईल. लसीकरणानंतर त्या व्यक्तीच्या मोबाईलवर संदेश येईल आणि क्यूआर कोड असलेले प्रमाणपत्रदेखील पाठविण्यात येईल.आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर व्यवस्था करण्यात येणार असून एका ठिकाणी १०० जणांना लसीकरणाची व्यवस्था होईल.फ्रंटलाईन वर्करच्या लसीकरणासाठी शासकीय अथवा खासगी रुग्णालये, शाळा, समाजमंदिर आदी ठिकाणी तर तिसऱ्या गटातील व्यक्तींना लसीकरणासाठी दवाखाने, शाळा, समाजमंदिर, ग्रामपंचायत, नगरपालिका अशा ठिकाणी लसीकरणाची व्यवस्था केली जाईल.