राज्यात अघोषित आणीबाणी; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार

मुंबई नगरी टीम

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने आमच्या सरकारच्या काळात सुरु झालेल्या अनेक बंद योजना करण्याचा सपाटा लावला असून, महाविकास आघाडी सरकारने एकही नवा प्रकल्प हाती घेतला नाही असे सांगतानाच,पत्रकार व विरोधकांवर या सरकारने अघोषित आणीबाणी लादली आहे.राजकीय नाट्य खेळून समाजासमाजात तेढ निर्माण केली जात असल्याने या सरकारला तोंड दाखवायलाही जागा राहिलेली नसल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

राज्य विधिमंडळाचे दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे.अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला.कोरोना महामारीच्या लढाईमध्ये राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार सपशेल अपयशी ठरले असून कोरोना उपाययोजना मध्ये या सरकारच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्तरावर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.केवळ दोन दिवसाचे अधिवेशन सरकार घेत असल्यामुळे आम्ही सरकारच्या चहापानावर बहिष्कार घालत आहोत, असेही फडणवीस व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले.मराठा आरक्षण, शेतकऱ्यांची नुकसान भरपाई आणि कोरोना संकटात हे सरकार समाधानकारक कामगिरी करु शकले नाही. विधिमंडळाचे अधिवेशन हिवाळी अधिवेशन नागपूरला घेण्याची मागणी आम्ही केली होती.उद्यापासून सुरू होणारे अधिवेशन हे दोन आठवडे घेण्याचा आग्रह आमचा होता मात्र हे सरकार चर्चेतून पळ काढणारे आहे अशी टीकाही फडणवीस यांनी केली.

देशात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू हे महाराष्ट्रात झाले आहेत.तर राज्यात ४८ हजार लोक कोरोनामुळे दगावले आहेत.कोरोना काळात झालेला भ्रष्टाचार संतापजनक असून,राज्यात कोरोना लाट थोपवण्यात आपण यशस्वी झालो असल्याचे मुख्यमंत्री सांगत आहेत, मात्र कोरोनाच्या लढाईत महाराष्ट्र सरकार पराभूत झाले आहे, असा दावा फडणवीस यांनी यावेळी केला.महिला अत्याचाराचे गुन्हे लवकर निकाली काढण्यासाठी या सरकारने शक्ती विधेयकाला मंजुरी दिली आहे.मात्र या अधिवशेनात शक्ती विधेयकावर कशी चर्चा होणार असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित करीत, शक्ती विधेयकावर चर्चा व्हावी, अशी मागणी केली.मात्र अधिवेशनात चर्चेला केवळ ७ तास मिळणार असल्याने चर्चा कशी होणार, असे फडणवीस म्हणाले.मराठा आरक्षणावर या सरकारने ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिली, ही दुर्दैवाची बाब आहे. यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सरकार आणि सरकारमधील मंत्री ओबीसी आरक्षणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करतात, असे म्हणत, सरकारमधील मंत्रीच मोर्चे काढतात याविषयी फडणवीस यांनी आश्चर्य व्यक्त केले.राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार तुघलकी असून एकांगी विचार करणारे आहे. या सरकारला अहंकाराने ग्रासले आहे.अशी सत्ता जास्त काळ चालत नाही असा टोला लगावतानाच हे सरकार त्यामध्ये असलेल्या अंतर्विरोधाने पडेल असे भाष्यही फडणीस यांनी यावेळी केले.

Previous articleकिल्लारीच्या भूकंपात मृत्यूला जगण्याची उमेद देणारा माणसातला देव मी पाहिला
Next articleदेशात घोषित आणीबाणी आहे काय ? फडणवीस यांच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचे प्रत्युतर