मुंबई नगरी टीम
मुंबई : आजपासून राज्याच्या दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले असून विविध मागण्यांसाठी त्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले.भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी यावेळी ओबीसी आणि धनगर आरक्षणाच्या मुद्दयावर लक्ष वेधण्यासाठी पारंपरिक पोशाख परिधान केला होता. गळ्यात ढोल घालून पाठीवर मागण्यांचे पोस्टर लावून त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. धनगर समाजाच्या आरक्षणविरोधात ठाकरे सरकार असल्याचे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल चढवला.
गोपीचंद पडळकर यांच्या पेहरावामुळे त्यांना सभागृहाजवळ पोलिसांनी अडवले. त्यांच्यापाठीवर लावलेले मागण्यांचे पोस्टर देखील पोलिसांनी मोडले त्यामुळे गोंधळाचे चित्र पाहायला मिळाले होते. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड देखील येथे पोहोचले. “धनगर आरक्षण मिळालेच पाहिजे”, “उद्धव ठाकरे हाय हाय”, अशा घोषणा देण्यात आल्या.त्यानंतर पडळकर यांनी माध्यमांशी संवाद साधत ठाकरे सरकारला धारेवर धरले.”हे सरकार झोपले आहे आणि त्यासाठी धनगर समाजाचे श्रद्धास्थान असणारा ढोल वाजवून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला.माझ्या पाठीमागे १६ विविध मागण्या असणारा बोर्ड लिहिला होता. काही कारण नसताना तो बोर्ड मोडला आणि ढोल वाजवण्यापासून रोखले. आमची ही लोककला आहे आणि कारण नसताना पोलिसांनी सरकारच्या सूचनेनुसार रोखले. मी ठाकरे सरकारचा निषेध करतो”, असे ते म्हणाले.
“धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत या सरकारने एकही बैठक घेतलेली नाही.तत्कालीन फडणवीस सरकारने २०१९ च्या अर्थसंकल्पात एक हजार कोटींपैकी पाचशे कोटींची तरतूद केली होती. त्यातला एक रुपया सुद्धा धनगर समाजाला या सरकारने दिलेला नाही. विरोधक असताना हीच लोक नागपुरात डोक्याला पिवळा फेटा, खांद्यावर घोंगडे, हातात काठी घेऊन अनेकवेळा आंदोलन करताना आपण पाहिले. पण आता ही लोकं सत्तेत असताना धनगरांचा तिरस्कार करत आहेत,” असा आरोप पडळकरांनी केला. “महाराष्ट्रातील ओबीसी, भटक्या समूहाच्या मागण्यांचा मी लिहलेला बोर्ड पोलिसांनी मोडला. विश्वासघात करुन सत्तेत आलेले सरकार महाराष्ट्रातील गोरगरिबांशी खेळत आहे. पण हे आम्ही चालू देणार नाही. हे मुघलांचे राज्य आहे का? अशी या सरकारची दादागिरी सुरु असून मी निषेध करतो. धनगरांच्या अभिमान, स्वाभिमान आणि भावनेशी हे सरकार खेळत आहे. या गोष्टीमुळे मंत्र्यांना गावागावत फिरणे मुश्कील होऊन जाईल. विश्वासघाताने सत्तेत आलेल्या या सरकारला आम्ही दादागिरी करु असे वाटत असेल, पण आम्ही ते मोडीत काढू”, असा इशारा गोपीचंद पडळकर यांनी दिला.