मुंबई नगरी टीम
मुंबई : सोलापूरचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्या सन्मानाने राज्याचेच नव्हे,तर देशाचा गौरव वाढवला आहे. शिक्षण क्षेत्रात अलौकिक कामगिरी करुन जागतिक पुरस्कार मिळविलेले डिसले गुरुजी यांची विधानपरिषद सदस्यपदी नियुक्ती करण्याची राज्य सरकारने राज्यपालांकडे शिफारस करावी अशी विनंती विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज केली.
सोलापूर जिल्हयातील परतेवाडी येथील युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणा-या ग्लोबल टिचर प्राईझ पुरस्कारासाठी डिसले गुरुजी यांची निवड करण्यात आली. याचा गौरव करण्यासाठी सभापतींनी आज विधानपरिषदेत डिसले गुरुजींचा अभिनंदन प्रस्ताव मांडला. या अभिनंदन प्रस्तावाला पाठिंबा देताना दरेकर यांनी सांगितले की, डिसले गुरुजी यांचा गौरव करण्यासाठी आपण स्वत: बार्शिला जाऊन त्यांचे व त्यांच्या कुटंबियांचे अभिनंदन केलं. डिसेल यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या अनमोल कामगिरीमुळे महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकाला कामाची खरी पावती मिळाली आहे. यामुळे अन्य शिक्षकांच्या कामाला व कतृत्वाला नक्कीच उभारी येईल, असा विश्वासही दरेकर यांनी व्यक्त केला.