मुंबई नगरी टीम
नागपूर : कांजूरमार्ग येथील जागेवर मेट्रो कारशेड उभारण्याला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे सरकारकडून वांद्रे कुर्ला संकुलात कारशेड उभारण्याच्या पर्यायी जागेची चाचपणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे. बुलेट ट्रेनची जागा मेट्रो कारशेडसाठी देण्याचा निर्णय सरकार घेत असून हे हास्यास्पद असल्याची टीका त्यांनी केली. राज्य सरकारचे सल्लागार कोण आहेत समजत नाही, जे राज्याला आणि सरकारला देखील बुडवायला निघालेत, असेही फडणवीस म्हणाले. शुक्रवारी नागपूर दौऱ्यादरम्यान त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी अशा बुलेट ट्रेन प्रकल्पासाठीची जागा मेट्रो कारशेडसाठी सुचवली जात आहे. परंतु त्याने सरकारला आर्थिक भुर्दंड किती आणि कसा बसू शकतो याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. बुलेट ट्रेन स्टेशनची जागा सरकार मेट्रो कारशेडसाठी देण्याचा निर्णय हास्यास्पद असून हा पोरखेळ चालवला आहे. बुलेट ट्रेनचे स्टेशन जमिनीच्या आत करायचे ठरवले तर त्याचा खर्च जवळ्पास पाच ते सहा हजार कोटी रुपये इतका असेल. मात्र ५०० कोटींमध्ये होणाऱ्या स्टेशनला जर पाच ते सहा हजार कोटी लागणार असतील तर तो भुर्दंड बसेलच. शिवाय त्याचा वार्षिक देखरेखीचा खर्च देखील पाच ते सहा पट अधिक असेल. त्यामुळे मुंबईकरांना मेट्रोपासून वंचित ठेवण्याचे हे षडयंत्र आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला. राज्य सरकारचे सल्लागार कोण आहेत समजत नाही, जे राज्याला आणि सरकारला देखील बुडवायला निघालेत, अशी टीकाही त्यांनी केली.
दरम्यान, कांजूरमार्ग येथील जागेवर मेट्रो कारशेड उभारण्यास न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला. न्यायालयाने यामध्ये पडू नये असे ते म्हणाले होते. यावरही भाष्य करत फडणवीस म्हणाले, सरकारने चुकीचे काम करायचे आणि न्यायालयाने चूक दाखवल्यावर न्यायव्यवस्थेला दोष द्यायचा. हा प्रकार न्यायालयाचा अवमान करणारा आहे, असा टोला त्यांनी लगावला.