पडळकरांसारखे पातळ नेसून नौटंकी करणारे आम्ही खूप पाहिले !

मुंबई नगरी टीम

कोल्हापूर : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना खरमरीत पत्र लिहत आपल्यावरील टीकेला उत्तर दिले.या पत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा देखील उल्लेख करण्यात आल्याने आता राष्ट्रवादी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.गोपीचंद पडळकर यांच्यासारखे पातळ घालून नौटंकी करणारे आम्ही खूप पाहिले,अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. पाच वर्षे सत्तेत असतानाही धनगर आरक्षण देता आले नाही, तेव्हा पडळकर कोणाचे चमचे होते, असे म्हणत मुश्रीफ यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला.

खरेतर मी आपणास शरद पवारांचा पंटर, खबऱ्या,चमचा असे संबोधू शकलो असतो,असे म्हणत पडळकर यांनी संजय राऊतांना टोला हाणला.याच मुद्दयावरून हसन मुश्रीफ यांनी पडळकरांवर टीकेची तोफ डागली. ते आज कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते. धनगर समाजाच्या आंदोलनासाठी गोपीचंद पडळकर यांनी बारामतीत आंदोलन केले होते. त्यावेळी तत्कालीन फडणवीस सरकारने धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिले होते. मात्र पाच वर्ष सत्तेत राहूनही ते आरक्षण देऊ शकले नाही. तेव्हा पडळकर कोणाचे चमचे होते? असा सवाल मुश्रीफ यांनी केला. पडळकर यांचा बोलवता धनी वेगळा असून त्यांना आवरावे, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

धनगर समाजाला आरक्षण न मिळवून देताच गोपीचंद पडळकर हे भाजपकडून आमदार झाले, असे सांगतानाच त्यांना शरद पवारांवर बोलण्याचा अधिकार नाही, असे हसन मुश्रीफ म्हणाले. पातळ घालून नौटंकी करणारे आम्ही खूप पाहिलेत, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली. दरम्यान, संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी पडळकर यांनी त्यांना पत्र लिहिले. “संजय राऊतजी आपला पगार किती आणि आपण बोलता किती? आपल्या पक्षाचे जेवढेही खासदार निवडून आले ते भाजपच्या आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भरवश्यावर निवडून आलेले आहेत, याचा इतका लवकर विसर पडला आपल्याला? पंतप्रधान मोदींवर वाट्टेल तसे आरोप करण्याची आपली लायकी तरी आहे का? उठसुठ कोणत्याही विषयावर आणि व्यक्तीवर काहीही बोलण्याचे लायसन्स आपल्याला मातोश्रीवरुन मिळाले की बारामतीच्या गोविंदबागेतून मिळाले हे महाराष्ट्राला कळू द्या.शरद पवार यांच्याविषयी मी मध्यंतरी काही विधाने केली. तेव्हा आपला चांगलाच जळफळाट झाला होता. ते साहजिकच आहे, कारण आपल्या निष्ठा मातोश्रीपेक्षा पवारांच्या चरणी अधिक आहेत, असे शिवसेनेतील आमचे मित्र आम्हाला सांगतात. माझ्यात सभ्यता आहे आणि अजूनतरी ती मी आपल्याबाबतीत सोडलेली नाही. पण आपली एकूणच पवारांबाबतची हुजरेगिरी पाहता आपल्याला तीच उपाधी मी देखील द्यावी, असे राहून राहून वाटते”, अशी जळजळीत टीका पडळकरांनी केली.

Previous articleराणेंचा उपमुख्यमंत्री अजित पवारांवर प्रहार ; वाचा काय म्हणाले !
Next articleठाकरे सरकारचे सल्लागार राज्य बुडवायला निघालेत; फडणवीसांचे टीकास्त्र