अजितदादांचा पडळकरांना टोला : आपण आमदार आहोत यांचे तारतम्य बाळगून वागायला हवे

मुंबई नगरी टीम

मुंबई । भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर मागील आठवड्यात झालेल्या हल्ल्याचे तीव्र पडसाद आज विधानसभेत उमटले.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यानी पडळकर यांच्यावर सांगली जिल्ह्यात जिवघेणा हल्ला झाल्याबद्दल स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला. या हल्ल्यात स्थानिक पोलीस अधिकारी कटात सहभागी असल्याचा आरोप त्यानी केला.यावेळी सरकारच्यावतीने उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परिषदेत सदस्य असणा-यांनी बोलताना तारतम्य बाळगण्याची गरज असल्याचे सांगितले.तर गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी या प्रकरणी वरिष्ठांमार्फत चौकशी करण्यात येत असल्याचे सांगितले.

यावेळी मुद्दा मांडताना फडणवीस म्हणाले की, याबाबत समाज माध्यमात जी क्लिप आहे ती पाहिली तरी हा भीषण हल्ला कसा जिवघेणा कट होता याची कल्पना येते. त्याबाबत पोलीस स्टेशन डायरीमध्ये घटना नमूद असल्याचे त्यांनी वाचून दाखवले. पोलीस कर्मचारी अधिकारी यावेळी बघ्याच्या भुमिकेत होते, इतकेच नाही तर शुटिंग करत होते असे ते म्हणाले. त्यानंतर पडळकर बंधुवरच गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्या अंगरक्षकाला निलंबीत करण्यात आले मात्र राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी ज्यांनी समाज माध्यमात पोस्ट करत कसा पडळकरांना धडा शिकवला असा मजकूर टाकला त्यांना कारवाई किंवा चौकशी करीताही बोलावण्यात आले नसल्याचे ते म्हणाले.

यावेळी उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, या घटनेबाबत चुकीचे कुणीच समर्थन करणार नाही मात्र काही लोकांना आपण आमदार आहोत यांचे काही तारतम्य बाळगून वागायला हवे याचे भान राहत नाही. अजित पवार चार दिवसांत राज्य विकून खातील अशी वक्तव्ये हे लोक करतात ज्यांना माझ्या गेल्या चाळीस वर्षाच्या कारकिर्दीबाबत माहिती आहे. असे ते म्हणाले. राज्य सरकार या प्रकरणी उच्च स्तरीय चौकशी करेल असे सांगत त्यांनी विषयावर पडदा टाकला.

Previous articleअजित पवारांची विधानसभेत घोषणा : वढू बुद्रुक येथे होणार संभाजी महाराजांचे प्रेरणास्थळ
Next articleमढ आयलंड मध्ये ८३० बंगल्याचे बोगस नकाशे; कोट्यवधींचा घोटाळा