अजित पवारांची विधानसभेत घोषणा : वढू बुद्रुक येथे होणार संभाजी महाराजांचे प्रेरणास्थळ

मुंबई नगरी टीम

मुंबई । स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या वढू बुद्रुक येथील समाधीस्थळ आणि परिसराचा विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्यानुसार याठिकाणी जागतिक दर्जाचे प्रेरणास्थळ बनविण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत निवदेनाद्वारे केली.तर यासाठी अंदाजे १५० कोटी रुपये इतका निधी आवश्यक असून तो टप्प्याटप्याने उपलब्ध करुन दिली जाणार असल्याची माहिती ही त्यांनी यावेळी दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेल्या निवेदनानुसार वढू बुद्रुक गावातील मुख्य प्रवेशद्वार हे ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा वाटेल,असे दगडामध्ये बांधकाम करण्यात येणार आहे.तर येथील समाधीस्थळाच्या भिंती व बुरुज इतिहासकाळास अनुरुप जस होते त्यापध्दतीने बांधकाम केले जाणार आहे. तर मावळा वीर शिवले यांच्या समाधीस्थळाचादेखील विकास केला जाणार आहे. समाधीस्थळांची दैनंदिन व्यवस्थापन पाहण्यासाठी कार्यालय व बहुद्देशीय सभागृह निर्माण केले जाणार आहे. त्याचबरोबर भक्त निवास देखील बांधले जाणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी यावेळी केली. त्याचबरोबर वढू ब्रद्रुक गावात वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी रिंगरोड तयार केला जाणार आहे. तर येथील नदीवर घाट बांधला जाणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले आहे.त्याचबरोबर समाधीस्थळाजवळ बारा बलुतेदार ग्रामीण संस्कृती प्रदर्शनातून मांडण्यात येणार आहे. येथील समाधीस्थळाच्या जंगलातून झाडे लावण्यात येणार आहेत. डोंगराळ प्रदेशातील अंतर्देशीय सरोवरे व पाणवठ्यांमुळे चिंच, करंज,गोरखचिंच, तुती, आंबा, फणस, कवट आणि कमखर सारख्या वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. त्याचबरोबर येथे पूल आणि बंधाऱ्यांच्या विकास केला जाणार असून गावातील अंतर्गत रस्त्यांचे रुंदीकरण केले जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

Previous articleकोरोना रूग्णांची संख्या वाढली, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय
Next articleअजितदादांचा पडळकरांना टोला : आपण आमदार आहोत यांचे तारतम्य बाळगून वागायला हवे