शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना समजावतील,भाजपच्या ‘या’ नेत्याला विश्वास

मुंबई नगरी टीम

मुंबई : कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडच्या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने आले आहेत. या प्रकरणात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मध्यस्थी करणार, या वृत्तावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.शरद पवारांशी वैचारिक मतभेत असले तरी त्यांच्यावर विश्वास आहे. शरद पवार व्यवहारी दृष्टिकोनातून निर्णय घेतील आणि मुख्यमंत्र्यांना समजावतील, असा विश्वास दरेकरांनी व्यक्त केला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाकडून कांजूरमार्गच्या जागेवरील मेट्रो कारशेडचे काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या जागेवर कारशेड बांधण्यास सत्ताधारी आग्रही आहेत. तर दुसरीकडे विरोधकांनी यावर आक्षेप घेतला आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना चर्चा करून तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे. तर शरद पवार या प्रकरणात मध्यस्थी करण्यास तयार असल्याची माहिती आहे. त्यावरून आता भाजप नेत्यांनी शरद पवारांवर विश्वास दर्शवला आहे. ते निर्णय घेतील, तो योग्य असेल असे मत भाजप नेते मांडताना दिसत आहेत.

भाजप आमदार राम सातपुते यांच्या लग्नसोहळ्यात झालेल्या गर्दीवरून भाजप नेत्यांवर सध्या सडकून टीका होत आहे. त्यावरही भाष्य करत प्रवीण दरेकर म्हणाले की, कार्यक्रमात जे काही झाले त्याचे कसलेही समर्थन नाही.काळजी ही घायलाच हवी आणि आपण ती घेत आहोत. मात्र राज्यात अनेक ठिकाणी आता सार्वजनिक कार्यक्रम होत आहेत. मंदिरे उघडली असून सगळे व्यवस्थित सुरू आहे.त्यामुळे नियम पाळायला हवेत, पण केवळ भाजप आमदाराचे लग्न आहे, मी आणि देवेंद्र फडणवीस तिथे होतो याचा राजकीय मुद्दा करायला नको. शिवसेनेचेही मेळावे होतात, दिल्लीत शेतकरी आंदोलन होत आहे, असे कितीतरी प्रसंग आहेत. झाला प्रकार हा चुकीचा होता, केवळ त्याचे राजकारण नको, अशी भूमिका दरेकरांनी स्पष्ट केली.

Previous articleकाँग्रेसच्या नेत्यांनी सोनिया गांधींचे ‘ते’ पत्र मुख्यमंत्र्यांना सोपवले
Next articleउद्यापासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत संचारबंदी