मी तोंड उघडले तर केंद्रातल्या सरकारला हादरे बसतील : संजय राऊतांचा इशारा

मुंबई नगरी टीम

मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार बनवण्याच्या प्रक्रियेतील जी प्रमुख लोकं आहेत. ही लोकं जेव्हा राजकीय दबावाला बळी पडत नाही तेव्हा त्यांना असे कागदाचे तुकडे पाठवले जातात.याला वैफल्य म्हणतात.ही भाजपची हतबलता आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमी आहे,असे आपण म्हणतो,तर समोर येऊन लढा.घरातली मुले आणि महिलांवर हल्ले करण्याला नामर्दानगी म्हणतात.अशी नामर्दानगी जर कुणी करत असेल तर, शिवसेना त्यांना त्याच पद्धतीने उत्तर देईल.कोणत्याही थराला जाऊन आम्ही उत्तर देऊ आम्ही घाबरत नाही,असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी देखील आपली चर्चा झाली असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली.

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचलनालयने (ईडी) नोटीस बजावली आहे. त्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत ईडीच्या नोटिशीसंदर्भात भाष्य केले.यावेळी त्यांनी भाजप नेत्यांवर टीकेची तोफा डागली.ईडी आमच्यासाठी काही महत्त्वाचा विषय नाही. सीबीआय, ईडी किंवा आयकर विभाग असेल यांना कधीकाळी प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. पण गेल्या काही वर्षापासून ईडीची नोटीस येणे कारवाई करणे म्हणजे एखाद्या राजकीय पक्षाने आपली भडास काढणे हे आता लोकांनी गृहीत धरले आहे.केंद्रातील पक्षाला जेव्हा विरोधकांना राजकीयदृष्ट्या संपवता येत नाही.तेव्हा अलीकडच्या काळातील ईडी, सीबीआय, आयकर विभाग सारखी हत्यारे वापरावे लागत आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

गेल्या वर्षभरामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार असतील प्रफुल्ल पटेल, एकनाथ खडसे,प्रताप सरनाईक,माझ्या नावाचा गजर तुम्ही करत आहात.महाराष्ट्राचे सरकार बनवण्याच्या प्रक्रियेतील जी प्रमुख लोकं आहेत त्यांना या ना त्या कारणाने त्रास दिला जात आहे.जे राजकीय दबावाला बळी पडत नाही त्यांना अशी नोटीस पाठवली जातात.महाराष्ट्राचे सरकार टिकू देऊ नका असा इशारा भाजपचे नेते देत आहेत. तुम्ही या सरकारच्या मोहात पडू नका. हे सरकार आम्ही कोणत्याही परिस्थितीत पाडायचे ठरवले आहे, असे भाजप नेते म्हणत आहेत. शिवसेनेच्या २२ लोकांच्या नावांची यादी दाखवली गेली. त्या लोकांना ईडीच्या नोटिसा जारी करा, त्यांच्यावर दबाव आणणे हे तंत्र अवलंबले जात असल्याचा धक्कादायक खुलासाही संजय राऊत यांनी केला.मी तोंड उघडले तर केंद्रातल्या सरकारला हादरे बसतील. भाजपच्या दिग्गज नेत्यांना नीरव मोदी आणि विजय मल्ल्यासारखे परदेशात पळून जावे लागेल, असा हल्लाबोल त्यांनी चढवला.

गेल्या दीड महिन्यापासून ईडी आमच्याकडे पत्रव्यवहार करत आहे. त्यांना काही माहिती कागदपत्र हवी होती. ती कागदपत्रे आम्ही त्यांना वेळोवेळी पुरवलेली आहेत. पण ईडीच्या कुठल्याही पत्रात त्यांनी असे कळवले नाही की हा पीएमसी बँक घोटाळा आहे. जर ईडीने त्यांच्या पत्रात यासंदर्भात काहीही उल्लेख केलेला नाही की, त्यांना कशा करता चौकशी करायची आहे. तर भाजपची माकडे कालपासून उद्या मारत आहेत पीएमसी बँक, पीएमसी बँक यांना सांगितले कोणी ? यांची आणि ईडीची काही हातमिळवणी आहे का?, असा सवाल संजय राऊत यांनी केला. ईडीच्या बॅलर्ड पियर येथील कार्यालयात कोणत्या भाजप नेत्यांचा वावर आहे हे तपासावे.त्यातून ईडीच्या कार्यालयात वावर असणारे नेते कोण हे स्पष्ट होईल. तीन महिन्यात भाजपचे तीन लोक ईडीच्या कार्यालयात जातात,तिथून काही कागद बाहेर काढून माहिती लीक करतात. माझ्याकडे पुरावे आहेत, असा खुलासाही त्यांनी केला. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देखील धारेवर धरले कालच मी देवेंद्र फडणवीसांचे ऐतिहासिक विधान ऐकले.ते असे म्हणाले की काही चुकीचे केले नसेल तर घाबरायचे कशाला ? नोटीस म्हणजे काय ब्रह्मवाक्य आहे का ? मी परत सांगतो, आमच्यापैकी कुणी काहीही चुकीचे केले नाही. नोटीस येऊद्या किंवा आणखी काही येऊ द्या. आम्ही घाबरत नाही, भविष्यात तुम्हाला घाबरावे लागले, असा सूचक इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे.

हा तर संजय राऊतांचा कांगावा

ईडी ने पाठवलेल्या नोटिशीबाबत शिवसेना नेते खा.संजय राऊत यांनी घेतलेली पत्रकार परिषद म्हणजे निव्वळ कांगावा होता. ईडी ने चुकीच्या पद्धतीने नोटीस पाठवली असं वाटत असेल तर खा.राऊत यांनी ईडी विरोधात खुशाल न्यायालयात जावे, असे प्रतिपादन भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केले.खा.राऊत यांची पत्रकार परिषद ही फक्त आणि फक्त कांगावा करण्यासाठी होती. राजकीय षड्यंत्र वगैरे गोष्टी बोलण्यापेक्षा राऊत यांनी त्यांच्या कुटुंबियांना आलेल्या नोटिशीबाबत ईडी कडे समाधानकारक उत्तर सादर करावे. ईडी ने चुकीच्या पद्धतीने नोटीस पाठवली असेल तर राऊत यांना ईडी विरुद्ध न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा आहे.उपाध्ये यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, सोमवारी सकाळपर्यंत नोटीस मिळालीच नाही असे म्हणणाऱ्या राऊत यांनी लगेच पत्रकार परिषद घेतली.पत्रकार परिषद घेण्याऐवजी त्यांनी नोटीस का बजावली गेली यामागच्या कारणांचा शोध घ्यावा व ईडी पुढे आपले म्हणणे सादर करावे.तसे करण्याऐवजी खा.राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन कांगावा करण्याचा मार्ग स्वीकारला, असेही उपाध्ये यांनी नमूद केले.

Previous articleपंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून पार्थ पवार निवडणूक लढवणार नाही !
Next articleईडीची कारवाई राजकीय हेतूने, आम्ही कुणालाही घाबरत नाही