नव्या वर्षात १ लाखांपेक्षा जास्त रिक्त असणाऱ्या पदांसाठी भरती करा

मुंबई नगरी टीम

मुंबई : महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांची मोठी संख्या लक्षात घेता सरकारने येणारे नवीन वर्ष २०२१ पासून,शासकीय सेवेत सध्या १ लाखांपेक्षा जास्त रिक्त असणाऱ्या पदांसाठी,तातडीने सुधारित महापोर्टल तयार करुन भरतीप्रक्रिया सुरु करावी,अशी शिफारस विधानसभा अध्यक्ष,नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना नूतन वर्ष २०२१ साठी शुभेच्छा दिल्या असून आपल्या पत्रात म्हटले आहे की,आपल्या कुशल नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार कोरोना संकटकाळाचा यशस्वीपणे मुकाबला करीत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे, त्याबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन. आपणास विदित आहेच की, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाच्या तसेच महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. राज्यातील मागील सरकारने मेगाभरतीचा फुगा फुगवून सुशिक्षित बेरोजगारांची दिशाभूल केल्याने तरूणांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात नैराश्याची भावना निर्माण झाली आहे. राज्याच्या अर्थचक्राला गती देणारा आणि राज्याच्या विकासात योगदान देणारा हा तरूण वर्ग अशा प्रकारे वैफल्यग्रस्त होणे उचित नाही. महाराष्ट्रातील शासकीय सेवेत सध्या एक लाखांपेक्षा जास्त पदे रिक्त असून सुशिक्षित आणि होतकरू तरूण वर्ग महाराष्ट्र लोकसेवा आयोग वर्ग-१, वर्ग-२ आणि वर्ग-३ विभागातल्या सेवाभरती प्रक्रियेकडे डोळे लावून आहे. यासंदर्भात होणारा विलंब त्यांच्यात नैराश्य आणि वैफल्य वाढविणारा ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या संदर्भात तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे.

कोरोना महामारी संदर्भात परिस्थिती आता बऱ्यापैकी नियंत्रणात येत असल्याने येणारे नवीन वर्ष २०२१ पासून ही भरती प्रक्रिया सुधारित महापोर्टलद्वारे तातडीने सुरु करण्यात यावी, त्याचप्रमाणे कोरोना संदर्भात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे वयोमर्यादा अट शिथिल करण्यात यावी, अशी शिफारस मी यासंदर्भात आपणाकडे करीत आहे. राज्यात मोठ्या संख्येने असणाऱ्या सुशिक्षित बेरोजगारांची भावना आणि राज्य सरकारकडून त्यांची असलेली अपेक्षा लक्षात घेता आपण यासंदर्भात लक्ष घालून तातडीने पावले उचलाल ही अपेक्षा,असे विधानसभा अध्यक्ष यांनी या पत्रात नमूद केले आहे.

Previous articleऐक्य करायचे नसेल तर प्रकाश आंबेडकरांनी एनडीएला पाठिंबा द्यावा
Next articleगट-क पदांच्या भरतीसाठी अंशकालीन कर्मचाऱ्यांना उत्तीर्णतेची गुणमर्यादा ४५ टक्क्यावरुन ४० टक्के ?