मुंबई नगरी टीम
पुणे : पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ब्रिटिशकालीन वास्तूच्या नूतनीकरणाचे काम अनेक वर्षे सुरू असल्याने विद्यापीठाच्या संग्रहात असलेली सुमारे सव्वादोनशे वर्षे जुने मराठे शाहीतील प्रमुख सवाई माधवराव पेशवे,नाना फडणवीस,महादजी शिंदे यांची चित्रे अडगळीत पडली असल्याचे समजताच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी यांची दखल घेत हा दुर्मिळ ठेवा योग्यप्रकारे जतन करण्याच्या सूचना विद्यापीठ प्रशासनास केल्या आहेत.याची माहिती सामंत यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संग्रहात अनेक दुर्मिळ चित्रे आहेत.परंतु अनेक वर्षे ही चित्रे पाहण्यात नसल्याने अनेकांना याबाबत माहिती नाही.ही चित्रे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत लावण्यात आली होती.मात्र विद्यापीठाच्या ब्रिटिशकालीन वास्तूच्या नूतनीकरणाचे काम बरीच वर्षे सुरू असल्याने ही चित्रे विद्यापीठ प्रशासनाने काढून ठेवण्यात आली आहेत.या चित्रांचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व मोठे असतानाही विद्यापीठ प्रशासनाकडून ही चित्रे अडगळीत ठेवण्यात आल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत होती.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दुर्मिळ अशा अनेक चित्रांचा वारसा जतन करण्यात आला आहे.यामध्ये सुमारे सव्वादोनशे वर्षे जुने अशा मराठे शाहीतील प्रमुख नेते सवाई माधवराव पेशवे, नाना फडणवीस आणि महादजी शिंदे पुणे दरबारात एकत्र असल्याच्या चित्राचाही समावेश आहे स्कॉटलंडमधून आलेल्या जेम्स वेल्स या चित्रकाराने हे चित्र काढले होते. तर यासाखी आणखी अनेक चित्रे संग्रहात आहेत.ही सर्व चित्रे अडगळीत ठेवण्यात आल्याची माहिती समजताच याची दखल उच्च व तंत्रशिक्षणमंत्री सामंत यांनी आज घेतली.
या पार्श्वभूमीवर उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. विद्यापीठातील दुर्मिळ चित्रठेवा जतन करण्याबाबत ही बैठक घेण्यात आली.उदय सामंत यांनी ट्विटरच्या माध्यमातून यासंदर्भात माहिती दिली आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे येथील दुर्मिळ चित्रठेवा बाबत आज आढावा बैठक पार पडली. विद्यापीठात असलेल्या दुर्मिळ वस्तू योग्यप्रकारे जतन कराव्यात अशा सूचना विद्यापीठ प्रशासनास केल्या”, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.यावेळी बैठकीत कुलगुरू डॉ.नितीन करमळकर, कला संचालक राजीव मिश्रा व संबंधित अधिकारी उपस्थित होते.हा दुर्मिळ ठेवा जतन करण्याच्या सुचना मंत्री सामंत यांनी देताच त्यांच्या या निर्णयाचे स्वागत सर्वसामान्य जनतेतून करण्यात येत आहे.शिवसेनेत प्रवेश केलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी या निर्णयाचे स्वागत करीत मंत्री सामंत यांचे आभार व्यक्त केले आहेत.