औरंगाबाद नामांतराला विरोध करणा-या बाळासाहेब थोरातांच्या फोटोला जोडे मारून निषेध

मुंबई नगरी टीम

औरंगाबाद : औरंगाबादच्या नामांतराला आमचा विरोध आहे अशी भूमिका राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मांडली.यावरून मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. मराठा ठोक क्रांती मोर्चाकडून शनिवारी औरंगाबादमध्ये आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी बाळासाहेब थोरातांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध व्यक्त केला. त्यामुळे काँग्रेसच्या या भूमिकेवर मराठा आंदोलनकांमध्ये संतापाची भावना आहे.दरम्यान भाजपकडून देखील काँग्रेसवर टीका केली जात असून सोबत शिवसेनेलाही लक्ष्य केले जात आहे.

औरंगाबाद महानगरपालिका निवडणूक जवळ आली असताना नामांतराचा मुद्दा राजकारणात चांगलाच तापला आहे. एकीकडे नामांतरावर शिवसेना सकारात्मक असून आघाडीतील काँग्रेसने मात्र याला विरोध दर्शविला आहे. तर काँग्रेसची हीच भूमिका असल्याचे पुन्हा एकदा काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी ठणकावून सांगितले. शनिवारी जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना चव्हाण यांनी काँग्रेसची रोखठोक भूमिका मांडली.औरंगाबादच्या नामांतराचा विषय हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही.नामांतराला आमचा विरोध आहे. आमची नुरा कुस्ती सुरू नाही.तर या मुद्द्यावरून आम्ही भाजप आणि एमआयएमसोबत नुरा कुस्ती खेळायला तयार आहोत,असेही ते म्हणाले. दरम्यान, नामांतराच्या विषयावर काँग्रेस आणि शिवसेनेची नुरा कुस्ती सुरू आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेला सूचक इशारा दिला आहे. औरंबादचे नामांतर हा शिवसेनेचा जुना अजेंडा आहे. मात्र राज्यात आता तीन पक्षांचे सरकार आहे, हे शिवसेनेने लक्षात ठेवावे, असे निरुपम यांनी म्हटले. युतीचे सरकार वैयक्तिक अजेंड्यावर नव्हे तर किमान समान कार्यक्रमावर चालते. हा कार्यक्रम काम करण्यासाठी तयार करण्यात आला आहे, नाव बदलण्यासाठी नाही, असा टोलाही संजय निरुपम यांनी लगावला. तर नामांतराच्या विषयावर शिवसेना लवकरच सविस्तर प्रतिक्रिया देणार असल्याचे पक्षातील नेत्यांनी सांगितले.

Previous articleसावित्रीबाई फुले विद्यापीठातील दुर्मिळ चित्रठेवा जतन करण्याच्या मंत्री उदय सामंतांच्या सूचना
Next articleराज्यात प्रत्यक्ष लसीकरणाला केव्हा सुरूवात होणार ? आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती