मुंबई नगरी टीम
मुंबई : केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी संपूर्ण देशभरात कोरोना लस मोफत देण्यात येणार असल्याची घोषणा केल्यानंतर काही वेळातच घुमजाव करीत १ कोटी आरोग्य सेवक आणि २ कोटी कोरोना योद्धे यांनाच देशभरात कोविड प्रतिबंधक लस मिळणार असल्याचे स्पष्ट करूनही भाजपचे नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी समाज माध्यमातून केंद्र सरकारचे अभिनंदन केले असल्याने हा मुद्दा चर्चेचा ठरला आहे.
संपूर्ण देशभरात कोरोना लस मोफत देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केल्यानंतर देशातील नागरिकांनी मोठा दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त केली.दिल्लीत आज पत्रकारांनी त्यांना दिल्लीप्रमाणे देशातील सर्व राज्यात कोरोना लस मोफत देणार का ? असा प्रश्न केला असता डॉ हर्षवर्धन म्हणाले की, कोरोना लस दिल्लीतच नाही तर सर्व देशात मोफत दिली जाणार आहे.मात्र काही वेळातच केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी एक ट्वीट करीत,सांगितले आहे की,१ कोटी आरोग्य सेवक आणि २ कोटी आघाडीचे कोरोना योद्धे यांनाच देशभरात कोविड प्रतिबंधक लस मिळणार आहे. जुलैपर्यंत उर्वरित २७ कोटी जनतेच्या लसीकरणाचा निर्णय घेतला जाणार आहे.आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या ट्वीटमुळे मोफत कोरोना लसीबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.
मोफत लसीकरणासंदर्भात देशातील नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असतानाच दुसरीकडे राज्याचे माजी अर्थमंत्री आणि भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी समाज माध्यमात एक पोस्ट शेअर करीत केंद्र सरकारचे अभिमंदन केले आहे.संपूर्ण भारतात कोरोनाची लस मोफत देण्याची घोषणा केल्याबद्दल केंद्र सरकारचे मन: पूर्वक अभिनंदन अशा आशयाचे पोस्टर मुनगंटीवार यांनी शेअर करीत केंद्राचे अभिमंदन केल्याने त्यांच्या या अभिनंदनाची चर्चा आता समाज माध्यमात होवू लागली आहे.बिहारमध्ये निवडणुकीच्या धामधुमीतच भाजपने मोफत लसीचे आश्वासन जाहीरनाम्यात दिले होते. केंद्राने अशी घोषणा कशी काय झाली यावरुन महाराष्ट्रासह इतर राज्यांना त्यावरुन आश्चर्याचा धक्का बसला होता.आज केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी मोफत लसीबाबत केलेले घुमजाव आणि त्यानंतर समाज माध्यमातून केले जाणारे अभिनंदन यावरून आता विरोध भाजपला घेरण्याची शक्यता आहे.