मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यातील पोलीस शिपाई संवर्गातील सुमारे साडेबार हजार रिक्त पदे भरण्याची घोषणा सप्टेंबर महिन्यात करण्यात आली होती.मात्र सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गातील ( मराठा समाज ) उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचा लाभ घेता यावा म्हणून यापूर्वी घोषणा करण्यात आलेली पोलीस भरती रद्द करण्यात आली असून,या निर्णयामुळे मराठा समाजातील उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचा लाभ देण्याच्या दृष्टीकोनातून सुधारित शासन निर्णय गृह विभागाकडून लवकरच निर्गमित करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
गेल्या सप्टेंबर महिन्यात गृहमंत्री देशमुख यांनी राज्यात साडेबार हजार पोलीस शिपाई संवर्गातील पदे भरण्याची घोषणा केली होती.त्यानुसार जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार मराठा समाजाच्या उमेदवारांना ( सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गातील ) पोलीस भरतीत खुल्या प्रवर्गातून भरती व्हावे लागणार होते.मात्र सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचा लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने आता ४ जानेवारी २०२१ रोजी जारी करण्यात आलेला शासन निर्णय रद्द करण्यात येत आल्याने मराठा समाजातील उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.पोलीस शिपाई भरती २०१९ करीता सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गातील उमेदवारांनी अर्ज केले होते, त्यांना शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून जारी करण्यात आलेल्या निर्णयाचा लाभ देण्याच्या दृष्टीकोनातून सुधारित शासन निर्णय गृह विभागाकडून लवकरच निर्गमित करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री देशमुख यांनी दिली आहे.पोलीस भरतीती मराठा समाजातील उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचा लाभ मिळावा म्हणून गृहविभागकडून आता शुद्धीपत्रक काढण्यात येणार आहे.