राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष झाले तर त्याचा फायदा विरोधी पक्षाला होईल

मुंबई नगरी टीम

मुंबई : काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाविषयी चर्चा रंगलेली असतानाच ही जबाबदारी आता राहुल गांधी यांना दिली जाण्याची शक्यता आहे. याविषयी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष झाले तर विरोधी पक्षाला त्याचा फायदाच होईल, असे संजय राऊत म्हणाले. तसेच सत्ताधाऱ्यांकडून राहुल गांधींवर वारंवार केल्या जाणाऱ्या टीकेवर देखील संजय राऊतांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईत गुरुवारी प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला.

राहुल हे गांधी हे काँग्रेसचे नेतृत्व करणार याबाबतच्या वृत्तावर संजय राऊत म्हणाले की, “राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होत आहेत,याचा विरोधी पक्षाला फायदाच होईल. काँग्रेस पक्ष या देशात मजबूत होणे गरजेचे आहे.आजही काँग्रेस पक्ष हा सर्वात जुना राजकीय पक्ष आहे. गावागावत पोहोचलेला पक्ष आहे. स्वातंत्र्य चळवळीत पक्षाचे योगदान हे अत्यंत महत्वाचे आहे.पंडित नेहरु,इंदिरा गांधी आणि सगळ्यांनीच देशासाठी खूप मोठा त्याग केला आहे.त्या पक्षाचे अध्यक्षपद हे देशातील आणि राजकारणातील एक महत्वाचे पद आहे. अशा काँग्रेसच्या नियोजित अध्यक्षाला प्रत्येक वेळेला ते विरोधी पक्षाचे नेते आहेत म्हणून अपशब्द वापरुन बोलणे आपली संस्कृती नाही”, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

“मी पाहतोय गेले काही महिने विरोधी पक्षातील नेत्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना सातत्याने केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यात गांधी कुटुंबसुद्धा आहे. इतर नेतेही आहेत, आम्ही देखील आहोत. असे किती काही प्रयत्न केले तरी भविष्यात विरोधी पक्ष एकजुटीने उभा राहील, संघर्ष करेल. सत्ततेतील लोकांनी या देशाचा इतिहास पाहिला पाहिजे. विरोधी पक्ष तुम्हाला आज जरी कमजोर वाटला तरी,तो अचानक फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेतो”, असा इशारा संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांना दिला.

गांधी कुटुंबाव्यतिरिक्त असा कोणी नाही का जो काँग्रेसचे नेतृत्व करू शकतो, असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना ते म्हणाले की, “हा प्रश्न आपण भाजपाबद्दल विचारला तर आजही नरेंद्र मोदीच नेते आहेत.पक्षात लोकशाही असल्याचे म्हणतात पण, तरी पक्ष कोणाच्या नावावर चालत आहे हे सर्वांना माहिती आहे. महाराष्ट्रात ठाकरे कुटुंबाच्या नावाने पक्ष चालतो. प्रत्येक पक्षाचा एक चेहरा असतो. तो चेहरा म्हणजे घराणे नाही. कुटुंबानेही पक्ष उभा करण्यासाठी आणि देश बनवण्यासाठी खूप त्याग केलेला असतो. यामध्ये गांधी कुटुंबाचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.गांधी कुटुंबच नेतृत्व करु शकते असे जर लोकांना वाटत असेल तर तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. त्यात आम्ही बोलण्याची गरज नाही”, अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली.

Previous articleपोलीस भरती रद्द ; नव्या भरतीत मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचा लाभ मिळणार
Next articleशहराचे नाव बदलून वातावरण प्रदूषित करण्याचे काही कारण नाही