शहराचे नाव बदलून वातावरण प्रदूषित करण्याचे काही कारण नाही

मुंबई नगरी टीम

मुंबई : औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरून आता महाविकास आघाडीमध्ये ठिणगी पडण्याची चिन्हे आहेत.नामांतराचा विषय तापलेला असतानाच मुंख्यमंत्री कार्यालयाकडून केलेल्या ट्विटमध्ये औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला होता.यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ट्विटरवरून नाराजी व्यक्त करत कठोर शब्दांत ठणकावून सांगितले होते.बाळासाहेब थोरात यांच्या या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात बरीच चर्चा रंगली असून यासंदर्भात त्यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

बाळासाहेब थोरात यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत याबाबत भाष्य केले.”उत्तम काम कसे होऊ शकते याचा आदर्श महाविकास आघाडीने घालून दिलेला आहे.पण असे असताना कोणत्याही एका शहराचे,गावाचे नाव बदलून वातावरण प्रदूषित करण्याचे काही कारण नाही, हे आमचे स्पष्ट मत आहे. तो किमान समान कार्यक्रमाचा भागही नाही, त्यामुळे अशा प्रकाराला आमचा पहिल्यापासून विरोध आहे. छत्रपती संभाजी महाराज आमचे सुद्धा एक आदर्श आहेत. आमच्या सर्वांचेच श्रद्धास्थान आहेत. परंतु विषय तो नाही, सामाजिक तेढ वाढू नये याची काळजी घेणे आवश्यक आहे. खरेतर जिथे सरकारी विभाग काम करते आहे, तिथे अशाप्रकारची चूक होता कामा नये, म्हणून मी त्यासंदर्भातील ट्वीट केले होते”, असे स्पष्टीकरण थोरात यांनी दिले. शिवाय मी ट्विटद्वारे मांडलेली भूमिका ही निश्चितपणे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली असेल असे त्यांनी म्हटले.

यावेळी बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबाद विमानतळाच्या नामांतराविषयी देखील भाष्य केले. छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने विमानतळाचा ठराव आम्ही केला असून तो केंद्राकडे पाठवला आहे. तो अद्याप मान्य झालेला नाही. केंद्र सरकार, भाजपची आणि तिथल्या नेत्यांची ही जबाबदारीआहे की, ठराव मंजुर करुन घेणे. पण ते करण्यास त्यांची तयारी नाही, असे चित्र आहे. कोणत्याही शहराचे नाव अशा पद्धतीने बदलू नये. काही राज्यांमधील ज्या शहरांची नाव बदलली आहेत, त्या शहरांतील सर्वसामान्य, गरिब माणसाच्या जीवनात काय परिणाम झाला का? त्याच्या जीवनात काही आनंद निर्माण झाला का? असा सवाल यावेळी थोरात यांनी उपस्थित केला. आपण सरकार म्हणून काम करतो, ते जनतेमध्ये आनंद निर्माण करण्याकरता करत आहोत, तेढ निर्माण करण्याकरता नाही”, असेही ते म्हणाले. तसेच तीन पक्षांमध्ये मतमतांतरे होऊ शकतात. पण याचा सरकारवर काही परिणाम होणार नाही. चर्चेने प्रश्न सोडवू असा विश्वासही बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

Previous articleराहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष झाले तर त्याचा फायदा विरोधी पक्षाला होईल
Next articleराष्ट्रवादी मुंबई महापालिका स्वबळावर लढविणार की आघाडी म्हणून ? अजितदादांनी केला मोठा खुलासा