राष्ट्रवादी मुंबई महापालिका स्वबळावर लढविणार की आघाडी म्हणून ? अजितदादांनी केला मोठा खुलासा

मुंबई नगरी टीम

मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढण्यावर ठाम आहे. शिवाय शिवसेनेने देखील पालिका निवडणुकीसाठी आपली तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीची भूमिका काय असणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता यावर वरिष्ठ नेते निर्णय घेतील, असे ते म्हणाले. तसेच आघाडीसोबतच पुढे जाण्याबाबत चर्चा असल्याची माहिती त्यांनी दिली.

मुंबई काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष भाई जगताप यांनी मुंबई महापालिकेत काँग्रेस स्वबळावर लढणार असे घोषित केले आहे. तर दुसरीकडे शिवसेना देखील पालिका निवडणुकीत भाजपला धूळ चारण्यासाठी रणनीती आखत आहेत.राहिला प्रश्न आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचा तर त्यांची भूमिका नेमकी काय? यावर प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, “राष्ट्रवादीची भूमिका सध्या तरी मित्रपक्षांसोबत आघाडी करुन पुढे जायचे, अशी चर्चा सुरु आहे. अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार आमच्या वरिष्ठांना आहे. म्हणजेच शरद पवार तसेच जयंत पाटील, नवाब मलिक इतर सर्वांशी चर्चा करुन पुढचा निर्णय घेतील. पण आमची मानसिकता आघाडी करावी, मतांची विभागणी होऊ नये अशी आहे. मतांची विभागणी होऊन ना मला, ना धड तुला, दे तिसऱ्याला अशा पद्धतीने होऊ शकते. मी तरी याबाबतीत सकारात्मक आहे,” असे अजित पवार यांनी सांगितले. यासंदर्भात चर्चा करू, जेणेकरून महाविकास आघाडीत काही अडचणी होणार नाहीत. विधान परिषदेप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेतही यश मिळवण्याचा प्रयत्न करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी अजित पवार यांनी सध्या चर्चेत असलेल्या नामांतराच्या विषयावर देखील भाष्य केले. महाविकास आघाडी किमान समान कार्यक्रमाच्या आधारे पुढे आली आहे. नामांतराच्या मुद्द्यावर एकत्र बसून चर्चा करू आणि मार्ग काढू, असे अजित पवार म्हणाले. सीएमओच्या ट्विटर हँडलवरून संभाजीनगर असा करण्यात आलेल्या उल्लेखाविषयी बोलताना ते म्हणाले, यावर संबंधित सहकाऱ्यांशी मी बोलणार आहे की नेमकं काय झाले होते. सरकारचे काम करत असताना एखादी गोष्ट काही घडलेली असेल तर त्यामागची पार्श्वभूमीवर नेमकी काय? हे जाणीवपूर्वक झाले की आणखी काही या बाबी आम्ही तपासू, असे अजित पवारांनी सांगितले.

Previous articleशहराचे नाव बदलून वातावरण प्रदूषित करण्याचे काही कारण नाही
Next articleमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींना शेतीतलं काय कळतं