मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींना शेतीतलं काय कळतं

मुंबई नगरी टीम

कणकवली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना शेतीमधले काय कळते ? काहीच कळत नसल्याने ते समर्थन कसे करणार ? विरोधच करणार,अशी टीका भाजप खासदार नारायण राणे यांनी केली.केंद्राच्या कृषी कायद्याच्या समर्थनार्थ भाजप नेते प्रचार करत आहेत. त्यामुळे या कायद्याला विरोध करणाऱ्यांना नारायण राणेंनी खडेबोल सुनावले.
केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांची विरोधी भूमिका ठाम आहे. त्यासाठी आज दिल्लीत शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढला. तर दुसरीकडे केंद्राच्या कृषी विधेयकांना समर्थन देत भाजपकडून कणकवली येथे ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार नितेश राणे, खासदार नारायण राणे, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनिल बोंडे व इतर नेते मंडळी उपस्थित होते.

यावेळी संबोधित करताना नारायण राणे यांनी कृषी कायद्याला विरोध करणाऱ्या उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींवर हल्लाबोल चढवला. “आपला शेतकरी श्रमाने, कष्टाने जे पिकवतो, उत्पादन घेतो. त्याला जिथे जास्त पैसे मिळतील तिथे त्याने कुठेही माल विकावा. आपल्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळाला याचे शेतकऱ्यांना समाधान मिळाले पाहिजे. म्हणून तसा कायदा पंतप्रधान मोदींनी आणला. शेतकऱ्यांच्या हिताचा बंधने सर्व काढून टाकली जिथे जास्त पैसे मिळतील तिथे माल विका, तर मग चुकले काय? का इथे आंदोलने होत आहेत? ही राजकीय आंदोलने आहेत. यात समेट होईल, असे मला वाटत नाही. राहुल गांधीला शेतीतले काय कळते? आणि शेतकऱ्यांना पाठिंबा देण्याच्या गोष्टी करतात. ठराविक राज्यातील शेतकरी आहेत. ठराविक लोक जे दलाल होते त्यांना आंदोलन करायला लावले, कामाला लावले आहे, खर्चाला लावले आहे”, असा आरोप नारायण राणे यांनी केला आहे.

उद्धव ठाकरेंना शेतीतले काय कळते? काही कळत नाही मग कसे काय समर्थन करणार? विरोधच करणार. मुख्यमंत्री झाल्यापासून उद्धव ठाकरे यांचे कामांवर स्थगिती आणणे हे एकच काम आहे. आरेची कारशेड कांजूरमार्गला हलवली, अरे आहे ते पूर्ण करा ना. बुलेट ट्रेन चालू होऊ दे. देवेंद्र फडणवीस मुख्यंमत्री असताना हे दौरे काढायचे. प्रत्येक पिकाला ५० हजार नुकसान भरपाई देईन, असे सांगितले होते. आता हात आखडले का? असा सवाल राणेंनी केला. अतिवृष्टीच्यावेळी कोकणाला मदत करणार काय झाले त्याचे? ठाकरेंचे आणि कोकणाचे वाकडे आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

शरद पवारांना राणेंचा अप्रत्यक्ष टोला

कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे जिल्हे ‘इंटरनॅशनल ग्रीनफिल्ड इनोव्हेटिव्ह रिजन’ म्हणून विकसित करण्याचा मानस राष्ट्रवादीचा आहे. तशा सूचनाही राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिल्या आहेत. यावरूनही नारायण राणेंनी राष्ट्रवादीला टोला लगावला. राष्ट्रवादी कोकणात अमुक तंत्रज्ञान आणणार तमुक करणार, असे त्यांचे चालले आहे. पैसे येतील तेव्हा ते राबवा मग बोला. राष्ट्रवादीचे असे कोणते कार्यकर्ते आहेत जे समाजाशी जुळलेले आहेत. लोक हिताची कामे करतायत. राष्ट्रवादीचे एकूण चार पाचच पुढारी आहेत, नेते वैगरे म्हणत नाही. या पक्षातून त्या पक्षातून फिरत आता घुटमळत आहेत, अशी टीका राणेंनी केली.

Previous articleराष्ट्रवादी मुंबई महापालिका स्वबळावर लढविणार की आघाडी म्हणून ? अजितदादांनी केला मोठा खुलासा
Next articleउद्धवा अजब तुझे सरकार म्हणणाऱ्या भाजपला,सचिन सावंतांचे ‘माविआ छे आपडा’ने प्रत्युत्तर