खुशखबर! राज्यात पोलीस दलात १२ हजार पदांची मेगाभरती

मुंबई नगरी टीम

नागपूर : राज्यात लॉकडाउनमुळे अनेकांच्या नोकरीवर कुऱ्हाड पडली आहे.अशा बेरोजगार तरुणांसाठी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे.राज्यात पोलीस दलात एक दोन नव्हे तर तब्बल १२ हजार ५३८ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.अनिल देशमुख यांनी यांसंदर्भातील आदेश गृहविभागाला दिले आहेत.त्यानुसार लवकरच ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.सोमवारी ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने पोलीस दलात शिपाई संवर्गातील १२ हजार ५३८ पदे भरण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. १२ हजार ५३८ पैकी ५ हजार ३०० जागा या पहिल्या टप्प्यात भरल्या जातील.त्याची प्रक्रिया चालू झालेली आहे. त्यानंतर लवकरच भरतीचा दुसरा टप्पाही पूर्ण केला जाईल, अशी माहिती अनिल देशमुख यांनी आहे. शिवाय १२ हजार ५३८ पदे भरल्यानंतरही अधिक भरतीची आवश्यकता असेल तर त्यासाठी राज्य शासन मंजुरी देईल, असे आश्वासनही गृहमंत्र्यांनी यावेळी दिले. त्यामुळे इच्छुक उमेदवारांसाठी निश्चितच ही आनंदाची बाब ठरली असून अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

दरम्यान, गृह विभागाने २०१९ मध्ये पोलीस भरतीचा निर्णय घेतला होता. मात्र, ९ सप्टेंबर २०२० मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एसईबीसी आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिलेली. त्यामुळे पोलीस भरती प्रक्रिया थांबवण्यात आली होती. मात्र पोलीस भरती २०१९ करिता एसईबीसीच्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले असून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीर राज्यातील पोलीस दलावर कामाचा मोठा ताण आहे. त्यामुळे पोलीस भरतीच्या या निर्णयामुळे हा ताण काहीसा कमी करता येऊ शकतो.

Previous articleराज ठाकरेंची सुरक्षा कमी केल्याने मनसेच्या नेत्या सरकारवर भडकल्या
Next articleआरोग्य कर्मचारी,पोलिस,सफाई कर्मचारी,जवानांना पहिल्या दोन टप्प्यात लस देणार