राज ठाकरेंची सुरक्षा कमी केल्याने मनसेच्या नेत्या सरकारवर भडकल्या

मुंबई नगरी टीम

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह राज्यातील काही महत्त्वाच्या नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयावर मनसे नेत्या रूपाली पाटील चांगल्याच भडकल्या आहेत. सरकारने डोके ठिकाणावर ठेवून काम करावे. नाहीतर त्यांची अवस्था भाजपसारखी होईल, अशा शब्दांत त्यांनी सत्ताधा-यांना सुनावले. राज ठाकरे यांचे लाखो, असंख्य चाहते असून हेच त्यांचे कवच आहे, असेही रूपाली पाटील यांनी ठणकावून सांगितले.

राज ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या अनेक नेत्यांची सुरक्षा व्यवस्था कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज ठाकरे यांची झेड (Z) दर्जाची सुरक्षा काढून त्यांना वाय (Y +) प्लस दर्जाची सुरक्षा दिली आहे. त्यामुळे राज्य सरकार यामध्ये राजकारण करत असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. मनसैनिकांनी देखील या निर्णयावरून सरकारला सुनावले आहे. सत्तेत आल्यापासून सरकारला याच खेळी करायला आवडतात का? असा सवाल रुपाली पाटील यांनी केला आहे. शरद पवार, राज ठाकरे यांसारख्या नेत्यांच्या सुरक्षा कमी करून त्यांचे महत्त्व कमी असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करत असाल, तर मोठी चूक करत असल्याचे इशारा रुपाली यांनी दिला आहे.

भाजपने देखील हेच केले असून त्यांच्यात आणि महाविकास आघाडीमध्ये काहीच फरक दिसत नाही. त्यामुळे सरकारने डोके ठिकाणावर ठेवून काम करावे. अन्यथा तुमची अवस्था भाजपसारखी होईल, असा टोमणाही त्यांनी मारला. चुकीचे निर्णय आणि सत्तेचा गैरवापर जनता पाहत असून त्याचा परिणाम सरकारवर होताे. त्यामुळे सरकारने सुरक्षा कपात केली तरी राज ठाकरे यांचे लाखो, असंख्य चाहते असून हेच त्यांचे कवच आहे, असेही त्या म्हणाल्या. दरम्यान मसने नेते बाळा नांदगावकर यांनी देखील सरकारचा हा खुजेपणा असल्याची टीका केली आहे. फेसबूकवर त्यांनी यासंदर्भात पोस्ट लिहत ठाकरे सरकारवर टीकस्त्र डागले.

Previous articleगुजराती समाजाच्या मेळाव्यावरून देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला डिवचले
Next articleखुशखबर! राज्यात पोलीस दलात १२ हजार पदांची मेगाभरती