गुजराती समाजाच्या मेळाव्यावरून देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला डिवचले

मुंबई नगरी टीम

लोणावळा : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना तयारीला लागली असून त्यासाठी अमराठी मतदारांना आकर्षित केले जात आहे.यासाठी शिवसेनेने खास गुजराती मेळाव्याचे आयोजन देखील केले होते.या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे.निवडणुकीव्यतिरिक्तही शिवसेनेने गुजराती समाजाशी सौहार्द ठेवावे,तेही आपले नागरिक आहेत.तर केवळ अशा कार्यक्रमांमुळे लोक जवळ येत नाहीत, तर तुमच्या कृतीमुळे येतात,असा सल्लाही फडवीसांनी दिला. लोणावळ्यात आज प्रसारमाध्यमांसी संवाद साधताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले.

निवडणुकीकरता का होईना शिवसेना गुजराती समाजाला जवळ करण्याचा प्रयत्न करत आहे.हे चांगलेच आहे. मात्र निवडणुकीच्या व्यतिरिक्तही शिवसेनेने गुजराती समाजाशी सौहार्द ठेवावा, शेवटी तेही आपले नागरिक आहेत.एकीकडे शिवसेना अहमदाबाद बुलेट ट्रेनला विरोध करत आहे.तर दुसरीकडे गुजराती समाजाला आम्ही जवळ घेऊ असे म्हणत आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे कोणी जवळ येत नाही. तर, तुमच्या कृतीतुन लोक जवळ येतात,असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. तसेच निवडणुका आल्यानंतर गुजरातीच काय तर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे पण आता जनाब झाले आहेत. उर्दूमध्ये शिवसेनेचे कॅलेंडर देखील निघत आहेत.निवडणुकीच्या निमित्ताने सगळी नौटंकी चालू आहे, हे आता लोकांना देखील समजू लागले आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

कोणालाही सुरक्षा द्या, आम्हाला फरक पडत नाही

देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांच्या सुरक्षा व्यव्यवस्थेत कपात करण्यात आली आहे. मात्र युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांना कोणत्या आधारावर सुरक्षा देण्यात आली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, वरून द्या, खालून द्या, याला द्या त्याला द्या. तुमच्या मनात असेल त्यांना सुरक्षा द्या आम्हाला आक्षेप नाही. सुरक्षा काढणे किंवा ठेवणे याणे मला फरक पडत नाही. आम्हाला आहे तेवढी सुरक्षा पुरेशी आहे, ती नाही ठेवली तरी काही अडचण नाही. मी आजही महाराष्ट्रात गार्ड शिवाय फिरू शकतो. सरकारने यासर्व गोष्टींवर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी भंडा-या सारख्या घटनेवर लक्ष घालावे, असेही फडणवीसांनी सुनावले.

Previous article…तर आरोप करणाऱ्यांना जोड्याने मारले नाही,तर माझे नाव संजय राऊत नाही !
Next articleराज ठाकरेंची सुरक्षा कमी केल्याने मनसेच्या नेत्या सरकारवर भडकल्या